तुळजापूर एम डी ड्रग्ज प्रकरणी सेवन गटातील आबासाहेब पवार संशयित आरोपी अटक
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर ड्रग्ज प्रकरणी आणखी एका संशयित आरोपीला अटक करण्यात आली असून, आबासाहेब पवार यास पुणे येथून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्यास तामलवाडी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील फरार असलेल्या आरोपीपैकी सेवन गटातील संशयित आरोपी आबासाहेब पवार यास पुणे येथून स्थानिक गुन्हे शाखेने शनिवारी (दि.१७) रात्री अटक केली. दरम्यान या प्रकरणी आत्तापर्यंत अटक झालेल्या संशयित आरोपींची संख्या १७ झाली असून, अजून १९ आरोपी फरार आहेत. गेल्या दोन दिवसात दोन संशयित आरोपींना अटक झाली आहे. पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्याने फरार असलेले इतर आरोपींच्या लवकरच मुसक्या आवळल्या जातील अशी शक्यता आहे. या संपूर्ण प्रकरणाचा पोलिस अत्यंत शिस्तबद्ध व नियोजनपूर्वक तपास करत असून एकूण ३६ आरोपी निष्पन्न केले आहेत. त्यामध्ये २६ जणांचा विक्री गटात तर १० जणांचा सेवन गटात समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये आत्तापर्यंत एकूण १७ जणांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणातील दोषारोपपत्रही न्यायालयात सादर करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश देशमुख व तामलवाडीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकूर हे करत आहेत.