तुळजापूरात साधकांनी घेतला सुदर्शन क्रियेचा अनुभव; आनंद अनुभूती शिबिराची उत्साहात सांगता;ऑनलाईन सेशनद्वारे अध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांचा साधकाना तणावमुक्त राहण्याचा संदेश
तुळजापूर : तुळजापूर येथील शिवपार्वती मंगल कार्यालयात सकाळी तर सायंकाळी आठवडा बाजार जवळील सुमेरु हॉलमध्ये दि.12 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट या कालावधीतील “आनंद अनुभूती शिबिरा” ची उत्साहात सांगता झाली. अध्यात्मिक गुरु तथा आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणते श्री श्री रविशंकर यांच्या संकल्पनेतून आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून संपुर्ण देशभरात याच कालावधीत आनंद अनुभूती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तर महाराष्ट्रात 33000 साधकांनी या आनंद अनुभूती शिबिरात सहभाग घेतला होता. त्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंगचे 4700 प्रशिक्षक तर हजारों वॉलेंटियर्सनी उत्कृष्टपणे सेवा बजावली आहे.
तुळजापूर येथे आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षक डॉ.जितेंद्र कानडे, प्रशांत संकपाळ,सचिन सूर्यवंशी, शशिकांत कदम,डॉ.राहुल पाटील,राजू देशमुख आणि स्वयंसेवक कार्तिक जगताप, विनायक शेटे,राहुल साखरे, विजयकुमार भगरे,प्रवीण मैंदर्गी,गणेश खानवटे,हनुमंत गपाट, बालाजी घुगे यांच्या पुढाकाराने स्वयंसेवकांनी आनंद अनुभूति उत्सव शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
सहा दिवस चाललेल्या या शिबिरादरम्यान योगा, प्राणायाम, ध्यान,आनंदी जीवनाची पाच सूत्रे, त्याबरोबरच सुदर्शन क्रियेचा सर्वांनी अनुभव घेतला. त्यामुळे उपस्थित सर्व साधकांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद ओसंडून वाहत होता. तसेच यापुढे 9 सप्टेंबर रोजी तुळजापूर मध्ये दुसरे “आनंद अनुभूती शिबीर” घेण्यात येणार असून या शिबिरात बहुसंख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वतीने करण्यात आले आहे.
यावेळी आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षक डॉ.जितेंद्र कानडे, प्रशांत संकपाळ,सचिन सूर्यवंशी,शशिकांत कदम यांनी मार्गदर्शन केले. तसेच डॉ.जितेंद्र कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुपुजा संपन्न झाली.
ऑनलाईन सेशनमध्ये अध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांचा साधकाना तणावमुक्त राहण्याचा संदेश
सांगता समारंभ प्रसंगी ऑनलाईन सेशनद्वारे अध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांनी सर्व सहभागी साधकांना तणाव मुक्त जीवन जगण्याचा संदेश देत प्रत्येकाच्या जीवनात ताणतणाव निर्माण होतो. हा तणाव दूर करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने संगीत,ज्ञान आणि साधना केली पाहिजे. संगीतामुळे मन प्रफुल्लित होते. ज्ञानामुळे जे घडले त्यातून पुढे वाटचाल करता येते आणि साधना,ध्यानामुळे शरीरस्वास्थ्य लाभते. या शरीरस्वास्थ्यामुळे मनुष्याचे आयुष्य तणावमुक्त होते,तुमच्या शब्दांनी कोणाला दुखवू नका..कोणी काय बोलले त्याकडे दुर्लक्षित करा…आपल्या सर्वांचे मन पाण्यासारखे स्वच्छ आणि प्रवाही असले पाहिजे. आपल्यामध्ये नकारात्मक भाव जेव्हा येतात,तेव्हा मन दगडासारखे बनते. मात्र, जेव्हा-जेव्हा मन स्वच्छ, नि:स्वार्थी असते,तेव्हाच ईश्वरप्राप्ती होते. ध्यान,साधना केल्यामुळे शरीराचे स्वास्थ्य सुधारते,बुद्धी तीक्ष्ण होते. त्यामुळे आपल्या सर्व प्रकारच्या इच्छा,आकांक्षा पूर्ण होतात. तसेच चांगला समाज निर्माण करण्यासाठी लोकांची सेवा करा. व्यर्थ चिंता करण्यापेक्षा जास्तीत जास्त लोकांना प्राणायाम, सुदर्शन क्रिया,ध्यान करण्यास प्रवृत्त करा, यामुळे एक सुसंस्कृत दिव्य समाज निर्माण होईल. असा संदेश आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांनी रविवारी झालेल्या ऑनलाइन सेशनद्वारे साधकांना दिला.
-शिबिरासाठी या स्वयंसेवकांचे परिश्रम
शिबिर यशस्वी होण्यासाठी कार्तिक जगताप, विनायक शेटे,राहुल साखरे,विजयकुमार भगरे,प्रवीण मैंदर्गी,गणेश खानवटे, हनुमंत गपाट,बालाजी घुगे या स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.
”आजच्या धावपळीच्या युगात नैराश्य, तणाव विरहीत आयुष्य जगायचे असेल तर साधनेला पर्याय नाही.ध्यानाच्या नियमित सरावामुळे मन शांत होते. दैनंदिन जिवनात योग,प्राणायाम सुदर्शन क्रिया केल्याने कार्यक्षमता वाढते आणि आत्मविश्वास वाढला जातो.”
–प्रशिक्षक प्रशांत संकपाळ, डॉ.जितेंद्र कानडे