डिसेंबरमध्ये दिलेल्या माहितीवरूनच पोलिसांची कारवाई आरोपी कोणीही असो, गय केली जाणार नाही : आमदार राणाजगजितसिंह पाटील

डिसेंबरमध्ये दिलेल्या माहितीवरूनच पोलिसांची कारवाई

आरोपी कोणीही असो, गय केली जाणार नाही : आमदार राणाजगजितसिंह पाटील

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

डिसेंबर महिन्यात ड्रग्ज विक्रीबाबत आपल्याला पहिली ठोस माहिती मिळाली. या विषयाची दाहकता लक्षात घेत तुळजापूर शहरातील माता-भगिनींना आपण दिलेल्या शब्दानुसार जिल्हा पोलीस अधीक्षकांना माहिती देत सूचना दिल्या. त्यांनीही गांभीर्याने दखल घेत प्रकरणाचे धागेदोरे लावण्यासाठी तातडीने प्रयत्न सुरु केले. दुर्दैवाने दोन वेळा यश मिळाले नाही, परंतु तिसऱ्यांदा मात्र यश मिळाले. मुंबई आणि तुळजापूर शहरातील कोणाचे यात संबंध आहेत याचे अनेक पुरावे आता पोलिसांच्या हाती लागले आहेत. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी यात लक्ष घातले आहे. पोलीस सध्या सखोल तपास करीत असल्याने त्यावर अधिक बोलणे योग्य राहणार नाही. आरोपी कोण आहे? कोणत्या पक्षाचा आहे? जवळचा आहे की दूरचा आहे याचा विचार न करता कोणाचीही गय केली जाणार नाही. याबाबत कोणाकडे आणखी माहिती उपलब्ध असेल तर त्यांनी न डगमगता आपल्याला कळवावे असे आवाहन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.

शहरवासीयांनी ड्रग्ज विरोधात पुकारलेल्या आंदोलनस्थळी दि. २१ फेब्रुवार शुक्रवारी भेट दिली. त्यांना वरील घडामोडींबद्दल अवगत करून यापूर्वीच्या घटनाक्रम सांगितला. विधानसभा निवडणुकीदरम्यान तुळजापूर शहरात बैठका घेत असताना शहरातील युवकांमध्ये ड्रग्ज सेवन मोठ्या प्रमाणात वाढत असल्याची आपल्याला माहिती मिळाली. याबाबत शहरातील माता-भगिनींनी मोठ्या कळकळीने भीती व्यक्त केली. तेंव्हा याविषयी प्राधान्याने कारवाई करण्याबाबत त्यांना आश्वस्त केले होते. तर नागरिकांनी त्यांच्याकडे याबाबत असलेली माहिती तात्काळ देण्याचे आवाहनही केले होते. २८ डिसेंबर रोजी पहिल्यांदा आपल्याला याबाबत ठोस माहिती मिळाली. तातडीने जिल्हा पोलीस अधीक्षकांना आपण अवगत केले. त्यानंतर त्यांची भेट घेऊन प्रकरणाची दाहकता त्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानुसार या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी एका विशेष पोलीस पथकाची नियुक्ती करण्यात आली. जानेवारी महिन्यात प्रयत्न करूनही या पथकाच्या हाती म्हणावे तसे धागेदोरे लागले नाही. त्यानंतर २ फेब्रुवारी रोजी आपल्याला आणखी माहिती मिळाली व ती आपण पोलीस अधिक्षकांना दिली. त्यानुसार त्यांनी साध्या वेशातील विशेष पोलीस पथक पाठवले. अनेक तास वाट पाहिली, सापळा लावला मात्र कदाचित आरोपींना याचा सुगावा लागला असावा त्यामुळे यावेळीही पोलिसांना यश मिळाले नाही. मात्र यातील संशयित आरोपींवर पोलिसांनी पाळत ठेवायला सुरुवात केली. त्यांच्या सगळ्या हालचालींवर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले होते. त्यानंतर १५ फेब्रुवारी रोजी पुन्हा एकदा माहिती मिळाली. यावेळी मिळालेल्या माहितीच्या आधारे तामलवाडी परीसरात पोलिसांनी यशस्वी कारवाई करीत ड्रग्जचा साठा जप्त केला व आरोपीना अटक केली. तोवर पोलिसांना ड्रग्स विक्रीच्या माहितीसह कोणीही निवेदन दिलेले नव्हते. पोलिसांनी स्वतः पुढाकार घेत मुंबई ते तुळजापूर अशी आरोपींची साखळी उघड केली आहे. अनेक महत्वाचे पुरावे पोलिसांच्या हाती आले आहेत. प्रकरण तापसाधीन असल्याने त्यावर लगेच काही बोलणे योग्य राहणार नाही. मुंबई पोलिसांशी देखील आपण याविषयी बोललो आहोत. हा विषय आपल्या मुलाबाळांच्या भविष्याचा असल्याने यात जवळचा की दूरचा, पक्षाचा की विरोधातला असला विचार न करता कोणीही असो त्याच्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश आपण दिले असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

हे प्रकरण संवेदनशील आहे. हा आपल्या पुढील पिढीच्या भविष्याचा प्रश्न आहे. याबाबत आणखी माहिती कोणाकडे उपलब्ध असेल तर त्यांनी ती आपल्याला कळवावी. यापूर्वी ज्यांनी माहिती कळवली त्यांची नावे ज्याप्रमाणे गुप्त ठेवून कारवाई करण्यात आली अगदी त्याचप्रमाणे आपले नाव उघड होणार नाही याची जबाबदारी आपली असेल. दुर्दैवाने आपल्या परिसरात, कुटूंबात किंवा नातेवाईकांमध्ये असे काही प्रकार निदर्शनास आल्यास तात्काळ आपण योग्य ती पावले उचलावी. सर्वांनी एकत्रित येऊन या संकटाला आळा घालणे अत्यावश्यक आहे. ज्याप्रमाणे तुळजापूरवासीय आज रस्त्यावर उतरून या बाबीचा निषेध नोंदवित आहेत, यापुढेही त्यांनी अशीच जागरूकता दाखविणे आवश्यक आहे. पोलीस प्रशासन प्रकरणाच्या खोलात घुसले आहे. यातील आरोपींची आता गय केली जाणार नाही. राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः यात लक्ष घातल्याने या प्रकरणाचा छडा लागल्याखेरीज राहणार नाही. आपण सर्वांनी सहकार्य केल्याशिवाय या विषारी विळख्याचे उच्चाटन होणार नाही. जोवर हे विष तुळजापुरातून समूळ नष्ट होत नाही तोवर सर्वांनी या विषयासाठी वेळ द्यावा असे आवाहनही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.

तुळजापूर शहरासाठी स्वतंत्र पोलीस ठाणे

तुळजापुर येथील श्री तुळजाभवानी देवी मंदीराच्या विकास आराखडयास शासनाने मंजुरी दिली आहे. यासोबत धाराशिव-तुळजापुर- सोलापुर या रेल्वे मार्गाचे काम प्रगतीपथावर आहे.आगामी काळात ही सर्व कामे पूर्ण झाल्यानंतर श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी येणा-या भावीकांच्या संख्येत मोठी वाढ अपेक्षित आहे. त्यामुळे श्री देवी मंदीर सुरक्षेच्या दृष्टीने व दर्शनासाठी येणा-या भावीकांच्या सोईसाठी तुळजापुर येथील सध्याच्या पोलीस ठाण्याचे विभाजन करून तुळजापुर शहर व तुळजापुर ग्रामीण असे दोन स्वतंत्र पोलीस ठाणे निर्माण करणे आवश्यक आहे. त्यासाठी लवकरात लवकर मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे, तुळजापुर मंदीर चौकीमध्ये पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या अधिका-याची नेमणुक करून तेथेही अधिकचे मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे, तुळजापुर शहरासाठी स्वतंत्र वाहतुक शाखा निर्माण करून, आवश्यकतेनुसार कर्मचारी व साहीत्यसामुग्री उपलब्ध करून देण्याची मागणी आपण राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे केली आहे. त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना याबाबत रीतसर प्रस्ताव पाठवण्याचे निर्देश दिले असल्याची माहितीही आ.पाटील यांनी लाक्षणीक उपोषण ठिकाणी पत्रकार परिषद घेवून दिली यावेळी सर्व पक्षाचे पदाधिकारी आजी माजी नगरसेवक आदि उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!