धाराशिव जिल्ह्यात केंद्र सरकारकडून महत्वाची नियुक्ती;अतिरिक्त स्थायी सरकारी वकील पदी ॲड. जनक कदम-पाटील
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
केंद्र सरकारच्या वतीने धाराशिव जिल्ह्यासाठी अतिरिक्त स्थायी सरकारी वकील म्हणून ॲड. जनक धनंजयराव कदम-पाटील यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. कायद्याच्या क्षेत्रातील त्यांचा अनुभव, कार्यकुशलता व सातत्यपूर्ण योगदान लक्षात घेऊन ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
ॲड. कदम-पाटील हे धाराशिव व तुळजापूर न्यायालयात गेल्या अनेक वर्षांपासून वकिली व्यवसाय करीत असून त्यांनी अनेक महत्वाच्या खटल्यांत प्रभावी कामगिरी बजावली आहे. त्याशिवाय ते भटके विमुक्त विकास प्रतिष्ठान, सोलापूर (महाराष्ट्र राज्य) या संस्थेचे ट्रस्टी म्हणून सामाजिक बांधिलकीची जपणूकही करीत आहेत.
कायद्याच्या क्षेत्राबरोबरच ते वित्तीय व बँकिंग क्षेत्राशी देखील जोडले गेले आहेत. विविध राष्ट्रीयकृत, शेड्युल्ड तसेच मल्टीस्टेट बँका यांच्या पॅनलवर कायदेशीर सल्लागार म्हणून त्यांची नियुक्ती असून त्यांनी गुंतागुंतीच्या कायदेशीर बाबींवर प्रभावी मार्गदर्शन केले आहे.
या नव्या नियुक्तीमुळे धाराशिव जिल्ह्यातील केंद्र सरकारच्या विविध न्यायालयीन कामकाजाला अधिक गती मिळेल, असा विश्वास व्यक्त होत असून त्यांच्या यशस्वी नियुक्तीबद्दल कायदे क्षेत्रातील सहकारी, सामाजिक मान्यवर व नागरिकांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.