ॲड. नितीन साळुंके यांची स्टॅंडिंग कौन्सिलपदी नियुक्ती; तुळजापूरचा अभिमान उंचावला
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
कायद्याच्या क्षेत्रात परिश्रम, चिकाटी आणि अभ्यासाच्या जोरावर यशाची नवी शिखरे गाठता येतात, याचा प्रत्यय तुळजापूरच्या सुपुत्राने घडवून दिला आहे. मिनिस्ट्री ऑफ लॉ अँड जस्टीस, दिल्ली यांनी १५ सप्टेंबर २०२५ रोजी काढलेल्या आदेशानुसार तुळजापूरचे सुपुत्र ॲड. नितीन सुरेश साळुंके यांची स्टॅंडिंग कौन्सिल फॉर युनियन ऑफ इंडिया (सरकारी वकील भारत सरकार) म्हणून प्रतिष्ठीत नियुक्ती करण्यात आली आहे.
मूळचे तुळजापूरचे रहिवासी असलेले ॲड. नितिन साळुंके हे सध्या छत्रपती संभाजीनगर येथील उच्च न्यायालयात वकिली करतात. अल्पावधीतच त्यांनी न्यायालयीन कामकाजात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांचे अभ्यासू व्यक्तिमत्व, कायद्यावरील सखोल अभ्यास, तर्कशुद्ध मांडणी आणि खंबीर भूमिकेमुळे केंद्र सरकारने त्यांना ही महत्त्वाची जबाबदारी दिली आहे. विशेष म्हणजे, ते या पदावर नियुक्त झालेले सर्वात कमी वयाचे एकमेव वकिल स्टॅंडिंग कौन्सिल आहेत.
तुळजापूर शहर, तालुका आणि संपूर्ण जिल्ह्यासाठी ही बाब अभिमानाची आहे. आता येणाऱ्या महत्त्वपूर्ण प्रकरणांत ते भारत सरकारची बाजू ठामपणे मांडतील, असा विश्वास व्यक्त होत आहे. त्यांच्या या यशाबद्दल वकिली क्षेत्रासह सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातून तसेच पत्रकार बांधवा कडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.ॲड. नितीन साळुंके यांच्या या नियुक्तीने तरुण वकिलांसमोर प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले असून तुळजापूरचा गौरव उंचावला आहे.
“कमी वयात एवढी मोठी जबाबदारी मिळणे ही खूप मोठी कामगिरी आहे. ॲड. नितीन साळुंके यांच्या मेहनतीला यश मिळाले असून त्यांनी तुळजापूरचा मान उंचावला आहे.”
-अजिंक्य रणदिवे, मुख्याधिकारी, न.प. तुळजापूर
“उच्च न्यायालयीन वकिलीतील त्यांचे कौशल्य व तर्कशुद्ध मांडणी लक्षात घेऊन केंद्र सरकारने त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवली आहे. हे यश तरुण वकिलांसाठी प्रेरणादायी आहे.”
– माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी,तुळजापूर
“तुळजापूरच्या सुपुत्राने अल्पावधीतच मोठा सन्मान मिळवला आहे. त्यांच्या यशामुळे संपूर्ण जिल्ह्याला अभिमान वाटतो.”
– माजी नगरसेवक विशाल रोचकरी,तुळजापूर
“कमी वयात एवढी मोठी जबाबदारी… तुळजापूरचा मान उंचावला”कौशल्याची दखल घेत केंद्र सरकारने दिला सन्मान; तरुण वकिलांसाठी प्रेरणादायी”
-ज्ञानेश्वर गवळी,तालुका पत्रकार संघ उपाध्यक्ष,तुळजापूर