सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामांचा घेतला आढावा कामे गुणवत्तापूर्ण आणि वेळेत पूर्ण करा – मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामांचा आढाव
धाराशिव : ज्ञानेश्वर गवळी
दि.१० फेब्रुवारी (जिमाका) सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणतीही तडजोड न करता कामे गुणवत्तापूर्ण आणि वेळेत पूर्ण करण्यावर भर द्यावा. कंत्राटदारांकडून योग्यप्रकारे कामे करून घेतली जावीत.असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिले. दि.१० फेब्रुवारी रोजी धाराशिवच्या सिंगोली विश्रामगृहात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामांचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती.सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री.भोसले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग,छत्रपती संभाजीनगरचे मुख्य अभियंता एस.आर.कातकडे,सार्वजनिक बांधकाम मंडळ धाराशिवचे अधीक्षक अभियंता बी.एम.थोरात,कार्यकारी अभियंता एस.के.चव्हाण आणि श्री.एन.व्ही. भंडे प्रमुख उपस्थित होते.
मंत्री भोसले म्हणाले की, मुख्यमंत्र्यांचा १०० दिवसांचा सात कलमी कार्यक्रम सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रभावीपणे राबवावा.कंत्राटदारांच्या कामाचे देयके अदा करण्यासाठी काही निधी मंजूर झाला असून,तो लवकरच वितरित केला जाईल.उर्वरित निधीही टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून दिला जाईल.कामांच्या गुणवत्तेबाबत कुठलीही तडजोड होऊ नये याची दक्षता घ्यावी.अनेकदा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामांची गुणवत्ता सुमार असल्याच्या तक्रारी येतात,त्यामुळे प्रत्येक कामाची काटेकोर तपासणी करा.तसेच कामांच्या ठिकाणी झाडे लावण्याचा आणि त्यांचे संगोपन करण्यात यावे. असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
श्री.भोसले यांनी सांगितले की,परंडा शहरातील मुख्य रस्त्यांची अपूर्ण कामे तातडीने पूर्ण केली जावीत.संबंधित कंत्राटदारांना निश्चित कालावधी देऊन ते काम पूर्ण करण्यात यावे. जे कंत्राटदार कामे अर्धवट सोडतात किंवा काम थांबवतात,त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात याव्यात.
रस्त्यावरील खड्डे बुजवण्याची कामे तांत्रिकदृष्ट्या योग्य प्रकारे केली जावीत,जेणेकरून खड्डे व्यवस्थित भरले जातील.यापुढे कोणत्याही कामाचे अंदाजपत्रक तयार करताना अधिक सावधगिरी बाळगावी आणि अनावश्यक खर्च टाळावा.सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यास आता परवानगी दिली जाणार नाही,असे त्यांनी स्पष्ट केले.
मुख्य अभियंता श्री.कातकडे यांनी जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या चालू प्रकल्पांची माहिती सादर केली.१०० दिवसांच्या कृती आराखड्यानुसार पुढील कामे नियोजित आहेत.यामध्ये येरमाळा येथील विश्रामगृहाचे बांधकाम १५ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.नळदुर्ग ग्रामीण रुग्णालयाच्या मुख्य इमारती व निवासस्थानाचे बांधकाम ३१ मार्च २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे.बेंबळी-नांदुर्गा रस्ता, करजखेडा-लोहारा-आष्टामोड रस्ता आणि परंडा-वादरवाडी फाटा-भातंब्रा-धाराशिव-सारोळा-
शिवली-बोरफळ रस्त्यांची कामे प्रगतीपथावर असून जामखेड – खर्डा-भूम-पारडीफाटा रस्ता,काटी -सावरगाव-सुरतगाव-पिंपळा-
देवकुरळी-काटगाव-टेलरनगर आणि कळंब-ढोकी-तेर रस्त्यांची कामे पूर्ण झाल्याची माहितीत्यांनी दिली.
बैठकीच्या शेवटी मंत्री भोसले यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या की,सर्व प्रकल्प निश्चित वेळेत आणि योग्य गुणवत्तेत पूर्ण होणे आवश्यक आहे.निधीचा योग्य वापर करून, रस्ते आणि सार्वजनिक बांधकाम प्रकल्पांचे नियोजन प्रभावीपणे पार पाडावे, असे त्यांनी सांगितले.या बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.