गुरुपौर्णिमा उत्सव
स्वामी समर्थांचे मंदिर यंदा आज प्रथमच २२ तास खुले राहणार
अक्कलकोट, : प्रतिनिधी
येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानात गुरुवार, १० जुलै रोजी गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या भक्तिभावात व उत्साहात साजरा होणार आहे. स्वामी समर्थ महाराजांना गुरु मानणारे हजारो भाविक या दिवशी ‘श्रीं’च्या दर्शनासाठी येतात. त्यामुळे २४ तासांपैकी २२ तास मंदिर दर्शनासाठी खुले ठेवण्याचा निर्णय मंदिर समितीने प्रथमच घेतला आहे.
पिण्याच्या पाण्याची सुविधा, मंदिरात प्रवेश व बाहेर जाण्यासाठी स्वतंत्र मार्ग, दोन ठिकाणी चप्पल स्टैंड, दर्शनासाठी विशेष रांग आदी सुविधा मंदिर समितीने उपलब्ध केल्या आहेत. पावसापासून भाविकांचे संरक्षण व्हावे यासाठी
दक्षिण महाद्वार ते गेटपर्यंत पत्राशेडची उभारणी करण्यात आली आहे.गुरुपौर्णिमेदिवशी पहाटे पाच ऐवजी चार वाजता काकड आरती होईल. त्यानंतर पुजारी मोहन पुजारी आणि मंदार महाराज यांच्या हस्ते गुरुपूजन होईल. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता मंदिराचे महाद्वार मध्यरात्री दोन वाजता उघडण्यात येणार आहे. तसेच गर्दीच्या पार्श्वभूमीवर स्वामी अभिषेकाचा कार्यक्रम यंदा बंद ठेवण्यात येणार असून अभिषेकासाठी पावती घेतलेल्या भाविकांना प्रसाद दिला जाईल. सकाळी ११.३० वाजता होणारी महानैवेद्य आरती यंदा १०.३० वाजता होईल. दुपारी १२ ते ३ या वेळेत मैंदर्गी-गाणगापूर रोडवरील भक्तनिवास येथे सर्व भाविकांसाठी देवस्थान समितीच्यावतीने महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच गुरुवारी रात्री आठ वाजता होणारा पालखी सोहळा यंदा गुरुपौर्णिमेनिमित्त विशेषरूपात संध्याकाळी सात वाजता होणार असून त्यानंतर शेजारती होईल, असे मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे यांनी सांगितले.