तुळजापूरच्या यात्रा मैदानासाठी पुजारी बांधवांचे तहसिलदार मार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी अर्ज
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर शहरालगत छत्रपती
संभाजीनगर महामार्गावर शासकीय जागेवर नियोजित यात्रा मैदान विकसित करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. तुळजापूर शहरातील पुजारी बांधवांनी या संदर्भात तहसिलदार मार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल केला आहे.
शासनाने दि.२८ फेब्रुवारी १९९८ रोजी स.न.१३८/१ येथे २ हेक्टर ६३ आर जमीन यात्रामैदानासाठी भूसंपादन केली होती. मात्र, काही वर्षांपूर्वी तुळजापूर नगरपरिषदेच्या काही माजी नगरसेवकांनी संगणमताने आणि कपटनितीचा वापर करून या जागेवर बोगस लेआऊट तयार केले आणि ती जमीन विकून लाटली, असा आरोप पुजारी बांधवांनी केला आहे.
या अर्जात पुजारी बांधवांनी म्हटले आहे की, तुळजापूर हे साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पुर्ण शक्तीपीठ आहे. येथे वर्षभर भाविकांची मोठी गर्दी असते. त्यामुळे यात्रामैदान झाल्यास भाविकांना मोठी सोय होईल. तसेच, शहरात येणाऱ्या रेल्वे प्रवाशांची संख्याही वाढणार आहे, ज्यामुळे भविष्यात यात्रा मैदानाची गरज आणखी वाढेल.
पुजारी बांधवांनी या प्रकरणी मुख्यमंत्री, नगरविकास मंत्री, विभागीय आयुक्त, तहसीलदार आणि मुख्याधिकारी यांनाही प्रत पाठवली आहे. त्यांनी बोगस लेआऊट रद्द करून कायदेशीर कार्यवाही करण्याची आणि भाविकांसाठी यात्रामैदान निर्माण करण्याची मागणी केली आहे. निवेदन देताना पुजारीवर्ग मोठ्या संख्येणे उपस्थित होते.