आश्रम शाळा जिल्हास्तरीय क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन.
धाराशिव : प्रतिनिधी
इतर मागास बहुजन कल्याण विभाग कार्यालय धाराशिव यांच्यामार्फत आयोजित करण्यात आलेल्या आश्रमशाळा जिल्हास्तरीय क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन आज (दि. 11) मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

प्रादेशिक उपसंचालक दिलीप राठोड,इतर मागास बहुजन कल्याण प्रादेशिक विभाग लातूर यांच्या हस्ते क्रीडा महोत्सवाचे उदाहरण करण्यात आले तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बाबासाहेब करवत सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण कार्यक्रम धाराशिव यांची उपस्थिती होती. जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत हरनाळे,शिक्षण विस्तार अधिकारी येडशी प्रकाश पारवे यांची प्रमुख उपस्थिती होती. तीन दिवस चालणाऱ्या या धाराशिव जिल्हा आश्रम शाळा क्रीडा महोत्सवामध्ये जिल्ह्यातील 35 शाळांच्या संघांनी सहभाग नोंदवला आहे. 10 आणि 11 तारखेला सांघिक तर 12 तारखेला वैयक्तिक स्पर्धा होणार आहेत.उद्घाटनाच्या प्रारंभी आश्रम शाळेतील क्रीडा पटू श्रद्धा लोहकरे हिने स्पर्धेची शपथ दिली. आश्रम शाळा स्पर्धेतील सहभागी शिंगोलीच्या मुलांनी क्रीडा ध्वजाला मानवंदना दिली. मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेचा ध्वज फडकवण्यात आला. मुख्याध्यापक खंडू पडवळ, आश्रम शाळेचे प्रमुख गुलाबराव जाधव,संतोष चव्हाण,दयानंद राठोड,अण्णासाहेब चव्हाण आदींची यावेळी उपस्थित होती. मान्यवरांना साहित्य ग्रंथाचे वाटप करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी बोलताना प्रादेशिक उपसंचालक दिलीप राठोड म्हणाले,शालेय क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून जय-पराजय पचवण्याची क्षमता शाळकरी मुलांमध्ये निर्माण होण्याची गरज आहे आणि त्या दृष्टीने सर्व स्पर्धकांनी स्पर्धेचा आनंद घ्यावा असे आवाहन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष चव्हाण यांनी केले. मुख्य उद्घाटन सोहळ्यानंतर आश्रम शाळा शिंगोली विरुद्ध आश्रम शाळा होळीच्या संघाच्या कबड्डी स्पर्धक संघाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. आदर्श आश्रम शाळा शिंगोली (ता.जि. धाराशिव) च्या मैदानामध्ये या स्पर्धा होत आहेत.
