संघटित गुन्हेगारी खपवून घेतली जाणार नाही
अन्याय सहन करू नका पोलीस अधीक्षकांकडे तक्रार द्या : आमदार राणाजगजितसिंह पाटील
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
राज्यातील अन्य जिल्ह्यांप्रमाणे आपल्या धाराशिव जिल्ह्यातील काही तालुक्यात संघटित गुन्हेगारीचे प्रकार घडत असल्याचे समोर येत आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक एकत्र येऊन सामान्य नागरिकांना त्रास देत असल्याच्या तक्रारी येत आहेत. अशाप्रकारे सामान्य नागरिकांना जर कोणी जाणून बुजून त्रास देण्याचा प्रयत्न करत असेल तर असे प्रकार अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी देखील याबाबत कठोर भूमिका घेतली आहे.त्यामुळे अन्याय सहन न करता संबंधितांनी याबाबत पुराव्यांसह पोलिस अधिक्षकांडे तक्रार द्यावी. आपण स्वतः व्यक्तीशी या बाबींची गांभीर्याने दखल घेऊ, अशा संघटित गुन्हेगारांना कायदेशीर अद्दल घडवू असे प्रतिपादन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.
सध्या जिल्ह्यात मोठ्या अनेक भागात पवनचक्की व सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याची कामे सुरू आहेत. याअनुषंगाने संघटित गुन्हेगारी क्षेत्रातील लोक दुष्प्रवृत्ती सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. सामान्य नागरिकांना वेठीला धरून त्यांना त्रास देणे, दबाव टाकणे अशा स्वरूपाची कृत्ये समोर आली आहेत. विविध स्तरातून याबाबत ऐकीव माहिती आपल्यापर्यंत पोहचली आहे.याअनुषंगाने जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना अशा प्रकरणात कायदेशीर कारवाई करण्याच्या सक्त सूचना दिल्या आहेत.जिल्ह्यातील शेतकरी असो की सामान्य नागरिक त्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आपले महायुती सरकार पूर्णतः कटिबद्ध आहे. त्यामुळे अशा प्रकारे कोणाला जाणीवपूर्वक कोणी त्रास देत असेल तर त्यांनी रीतसर आवश्यक त्या पुराव्यासह पोलिसांकडे तक्रार द्यावी व त्याची पोच घ्यावी. आपण स्वतः योग्य ती दखल घेऊन पोलिसांच्या माध्यमातून त्याला पायबंद घालण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचेही आमदार पाटील यांनी सांगितले आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग प्रकरणी विधानसभेत उत्तर देताना मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी देखील याबाबत कठोर पावले उचलणार असून संघटित गुन्हेगारी संपवण्यासाठी मोक्कासारखा कायदा वापरला जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आपल्या धाराशिव जिल्ह्यात देखील संघटित गुन्हेगारीचे प्रकार घडत असतील तर नागरिकांनी याबाबत पुढे येऊन तक्रार द्यावी. बीड प्रमाणेच इथे देखील अशा गुन्हेगारांना पायबंद घालण्यासाठी मोक्का कायद्याचा वापर करण्यात येणार असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले आहे.
पवन ऊर्जा प्रकल्पासाठी झालेल्या जमीन खरेदीत कांही अनियमितता किंवा गैरव्यवहार झाले असतील,जमीन मालक किंवा शेतकरी यांच्या कांही तक्रारी असतील तर त्याचे निराकरण करण्यासाठी शासनाने जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली “पवन ऊर्जा प्रकल्प – जिल्हास्तरीय सनियंत्रण समिती” स्थापन केली असून त्यात जिल्हा पोलीस अधीक्षक देखील सदस्य आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी जर जमीन खरेदीच्या अनुषंगाने कांही तक्रारी असतील तर त्याबाबत दाद मागण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज करावा.