तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे या मागणीवर मनोज जरांगे ठाम आहेत. दरम्यान, मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीत मराठा समाजाचे उमेदवार रिंगणात उतरवण्याची तयारी देखील केली होती. मात्र, फॉर्म्युला जुळत नसल्याचे सांगत त्यांनी ऐनवेळी माघार घेतली. फॉर्म्युला जुळला असता, तर सुफडा साफ केला असता, असेही जरांगे यावेळी म्हणाले.मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आज तुळजापूर येथे तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. दर्शनानंतर बोलताना त्यांची आंदोलनाबाबत मोठी घोषणा केली. मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणावरून पुन्हा एकदा सरकारला इशारा दिला आहे. पुढील आंदोलन मुंबईतील आझाद मैदानावर होऊ शकते, असे मनोज जरांगे म्हणाले. सरकार कुणाचेही आले, तरी मुंडक्यावर पाय देऊन आरक्षण घेणार, असा इशाराही मनोज जरांगे यांनी यावेळी दिला.