श्री तुळजाभवानी देवी शारदीय नवरात्र महोत्सवाला राज्याच्या प्रमुख पर्यटन महोत्सवाचा दर्जा
तुळजापूर, : ज्ञानेश्वर गवळी
महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेले श्री तुळजाभवानी देवीचे तुळजापूर येथील प्राचीन मंदिर हे देशभरात प्रसिद्ध असून, येथे दरवर्षी शारदीय नवरात्र महोत्सवाच्या काळात लाखो भाविकांची गर्दी उसळते. छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार देण्यात आल्याबाबतची आख्यायिका देखील या मंदिराशी जोडलेली असल्यामुळे या महोत्सवाला ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
नवरात्र महोत्सवाच्या दहा दिवसांत तुळजापूर शहर धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक रंगांनी नटते. महाराष्ट्रासह कर्नाटक, तेलंगणा आणि देशभरातून सुमारे ५० लाख भाविक या कालावधीत दर्शनासाठी हजेरी लावतात. गोंधळी गीत, भजन, नृत्य, शास्त्रीय व लोकसंगीत यांसारखे कार्यक्रम महोत्सवाचा केंद्रबिंदू असतात. राष्ट्रीय व प्रादेशिक स्तरावरील ख्यातनाम कलाकारांबरोबरच स्थानिक कलाकारांनाही प्रोत्साहन देण्यात येते.
धाराशिव जिल्ह्यात तुळजापूरच्या आसपास अनेक पर्यटनस्थळे असून, नळदुर्ग किल्ला, तेर येथील संत गोरोबा काका मंदिर, येरमाळा येथील येडेश्वरी मंदिर, येडशी येथील रामलिंग अभयारण्य आणि परांडा भुईकोट किल्ला हे भाविकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरतात. येरमाळा येथील येडेश्वरी देवीला तुळजाभवानीची धाकटी बहीण मानले जाते, त्यामुळे भाविक दोन्ही देवतांचे दर्शन घेतात.
पर्यटन विभागाने राज्यातील पर्यटन स्थळांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यापक प्रमाणावर प्रसिद्धी देण्याचा संकल्प केला आहे. याच अनुषंगाने सन २०२५-२६ या वित्तीय वर्षातील महोत्सव दिनदर्शिकेत “श्री तुळजाभवानी देवी शारदीय नवरात्र महोत्सव” याला राज्याचा प्रमुख पर्यटन महोत्सवाचा दर्जा देण्यात आला आहे. जिल्हाधिकारी धाराशिव यांच्या प्रस्तावानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.
आयोजित उपक्रम
महोत्सव काळात स्थानिक लोककला, लोकनृत्य, गोंधळी गीत, भारुड, जाखडी, गोंधळ, भजन स्पर्धा, किर्तन आदींचे आयोजन होणार आहे. याशिवाय राष्ट्रीय व प्रादेशिक स्तरावरील सुप्रसिद्ध कलाकारांचे सांस्कृतिक कार्यक्रमही रंगणार आहेत. २२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत होणाऱ्या या महोत्सवाचे थेट प्रक्षेपण महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या संकेतस्थळावर व YouTube चॅनेलवर केले जाईल.
भव्य लोकसंगीत मैफल, ३०० ड्रोनच्या साहाय्याने नवरात्र थीमवर आधारित लाईट शो, जबाबदार व शाश्वत पर्यटन या विषयावर चित्रकला स्पर्धा, व्याख्याने, मॅरेथॉन, पर्यटन विषयक कॉन्क्लेव्ह, फेअर्स तसेच फॅम टूर्स यांचा समावेश करण्यात आला आहे.
प्रसिद्धी व सुविधा
या महोत्सवाची मराठी व इंग्रजी भाषेत यथोचित प्रसिद्धी केली जाणार असून, प्रेस नोट्सही द्विभाषिक स्वरूपात प्रसिद्ध करण्यात येतील. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या निवासस्थानांमध्ये थांबणाऱ्या पर्यटकांना महोत्सवात सहभागी होण्याची माहिती दिली जाईल. तसेच महोत्सवासाठी महाराष्ट्र पर्यटनाचा लोगो वापरण्यात येईल.
सुप्रसिद्ध म्हैसूर दसरा महोत्सवाप्रमाणे मराठी व इंग्रजी भाषेत व्यापक प्रसिद्धी केल्यास देशी-विदेशी पर्यटकांची संख्या वाढते, हे लक्षात घेऊन तुळजापूरच्या नवरात्र महोत्सवाची प्रसिध्दीही त्याच पद्धतीने केली जाणार आहे.
या निर्णयामुळे तुळजापूरचा शारदीय नवरात्र महोत्सव केवळ धार्मिक आणि सांस्कृतिक सोहळाच नव्हे, तर राज्याच्या पर्यटन वृद्धीचा प्रमुख केंद्रबिंदू ठरणार आहे.