भुम मध्ये गोवंशीय जनावरांची निर्दय वाहतूक उघड;पोलिसांची कारवाई,आरोपीवर गुन्हा दाखल
भुम : प्रतिनिधी
गोवंशीय प्राण्यांची निर्दयपणे वागणूक देत बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या एका व्यक्तीविरुद्ध भुम पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई रविवारी (दि.१४ सप्टेंबर) सकाळी सहा वाजून तीस मिनिटांच्या सुमारास हाडोंग्री पाटीजवळ पार्डी रोड परिसरात करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अन्सार रसुल कुरेशी (वय २८) याने टाटा कंपनीचा ट्रक (क्र. एमएच ४७ बीएल १०३३) मधून गोवंशीय जातीच्या जर्सी गायी बेकायदेशीररीत्या वाहून नेण्यात येत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून छापा टाकला असता, वाहनातून गायींची वाहतूक होत असल्याचे आढळून आले.
या जनावरांना वाहतुकीदरम्यान ना चारा, ना पाणी यांची सोय करण्यात आली होती. उलट कत्तलीसाठी निर्दयतेने त्यांची वाहतूक केली जात असल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले. पोलिसांनी या कारवाईत एकूण ८,७५,००० रुपयांचे गोवंशीय जनावरे व वाहन जप्त केले.
याप्रकरणी आरोपीवर प्राण्यांवर क्रूरतेने वागण्यास प्रतिबंध अधिनियम कलम ११(ड)(इ)(ई)(ऐ)(ठ), प्राणी संरक्षण अधिनियम कलम ५(अ), ५(ब), ९, ९(अ) तसेच मोवाका कलम ६६/१९२ अन्वये भुम पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.पुढील तपास भुम पोलिसांकडून सुरू आहे.