तुळजापूरमध्ये ऑनलाइन फसवणुकीचा धक्कादायक प्रकार: पिता-पुत्राची १६ लाखांहून अधिक रकमेची फसवणूक
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर तालुक्यातील एका ५४ वर्षीय व्यक्ती आणि त्यांच्या मुलाची अज्ञात आरोपींनी जास्त पैशांच्या आमिषाने फसवणूक केली आहे. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
घटनेच्या तपशीलानुसार, फिर्यादी कालीदास लिंबाजी गवळी (वय ५४ वर्षे, रा. शुक्रवार पेठ, कणे गल्ली, तुळजापूर, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) यांच्या मुलगा कृष्णा याला आरोपींनी जास्त पैशांचे आमिष दाखवले. शासनाने ऑनलाइन गेमिंगवर बंदी घातलेली असतानाही, आरोपींनी ‘exchange.com’ नावाची एक बनावट लिंक तयार करून ती व्हॉट्सअँप पाठवली. या लिंकद्वारे फिर्यादी आणि त्यांच्या मुलाची एकूण १६ लाख ८५ हजार ४९८ रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली.
फिर्यादीनुसार, आरोपींनी वेगवेगळ्या मोबाइल नंबरांवरून संपर्क साधला. यात ९०९१९१५८९१, ९५६१४६३८०८, ८४८५०१७४९०, ८७६६४०६५०७, ८४४६२२३५८४, ८०१०७८१८३९, ८४४६९६४५५४ आणि ७३९१८२२००८८ या नंबरांचा समावेश आहे. हे नंबर वापरून आरोपींनी विश्वास संपादन करत फिर्यादींना बनावट योजनेत गुंतवले आणि त्यांची आर्थिक फसवणूक केली.
या घटनेची फिर्याद कालीदास गवळी यांनी २३ ऑगस्ट २०२५ रोजी सायबर पोलिस ठाण्यात दिली. त्यानुसार, पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता कलम ७८, ३५६(२) आणि माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६(सी) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. सायबर पोलिस ठाण्याचे अधिकारी या प्रकरणाचा तपास करत असून, आरोपींच्या मोबाइल नंबर आणि बनावट लिंकचा मागोवा घेण्याचे काम सुरू आहे.