सेंट्रल बिल्डिंगच्या मागे थाटले दारु वासयुक्त ओपन बिअर बार !
राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक बारगजे यांचा प्रताप !
अभिलाषी सुगंधामुळे न पिताच अनेकजण झिंगाट ;
धाराशिव : ज्ञानेश्वर गवळी
जिल्ह्याच्या विविध भागात रात्रोसपणे दारू विक्री केली जाते. यामध्ये गल्लीबोळ व चौकाचौकात अवैध दारू विकली जाते. या अवैध दारूला व दारू विक्री करणाऱ्यांना जरब बसावा यासाठी महाराष्ट्र शासनाने खास प्रत्येक जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क कार्यालये सुरू केलेली आहेत. मात्र याच कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील अवैध दारू बंद करण्याचे तर सोडाच, परंतू ज्या ठिकाणी या विभागाचे कार्यालय आहे. अगदी त्या इमारतीच्या पाठीमागे समोरच्या व्यक्तींना न दिसेल अशा ठिकाणी रस्त्यालगत राजरोसपणे दारूच्या अभिलाषी दरवळलेल्या सुगंधी दारुचा अड्डा थाटल्याचे चित्र दिसून येत आहे. या विविध ब्रॅण्डेड दारूच्या दरवळामुळे अनेकांना न पिताच त्या दारूच्या हवेतील अभिलाषी सुगंधामुळे जबरदस्त नशा होत असल्याने ते आपोआप झिंगाट होत आहेत. हा पराक्रम दुसरा तिसरा कोणी केला नसून खुद्द दारूबंदी विभागाच्या अधीक्षक गणेश बारगजे व त्यांच्या सहकारी अधिकाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर पालकमंत्री, खासदार, आमदार व जिल्हाधिकारी कोणती कारवाई करणार ? याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागून राहिले आहे.
धाराशिव शहराततील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये विविध विभागांची ४६ कार्यालये थाटलेली आहेत. त्यामध्ये राज्य उत्पादन शुल्क अर्थात दारूबंदी कार्यालयांचा देखील समावेश आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक आहेत गणेश बारगजे. या कार्यालयामधील अधिकाऱ्यांकडे जिल्ह्यातील साखर कारखाने यांच्याकडील असलेली मळी तसेच जिल्ह्यात उत्पादीत होत असलेल्या अवैध दारू अड्ड्यांवर धाडी टाकून ते उद्ध्वस्त करण्याची मुख्य जबाबदारी आहे. तसेच अधिकृत बियर बार व देशी दारू दुकानाच्या माध्यमातून जास्तीत जास्त शासनाची दारू विक्री करून टॅक्सच्या रूपाने उत्पादन वाढविण्याचे काम त्यांच्यावर सोपविलेले आहे. त्यासाठी संबंधित अधिकारी वेगवेगळ्या बियर बार व देशी दारू विक्री दुकानांमध्ये जाऊन त्या ठिकाणी विक्रीसाठी असलेल्या दारूचे नमुने तपासण्यासाठी हव्या त्या ब्रँडच्या दारू घेऊन कार्यालयात आणतात. त्या दारुमध्ये काही भेसळ आहे किंवा नाही ? याची तपासणी केली जाते. त्या दारूच्या बाटल्या आणताना त्यांना संबंधित दुकानदारास एक रुपया देखील देण्याची गरज नसते. त्या तपासणीच्या नावाखाली वर्षानुवर्ष आपल्या कार्यालयातील दर्शनी भागांमध्ये सजावट केल्यासारखे तेथील कपाटांमध्ये ठेवतात. ती दारू तपासल्यानंतर ती बनावट आहे की नाही ? याचा अहवाल संबंधित दुकानासह वरिष्ठ कार्यालयात देणे गरजेचे असते. त्यानुसार संबंधिता विरोधात कारवाई केली जाते. मात्र अशा प्रकारची कारवाई अशात झालेले दिसून येत नाही. मात्र तपासणीसाठी आणलेल्या देशी, विदेशी व गावठी दारु तसेच दारू बनविण्यासाठी आवश्यक असलेले रसायन देखील काही ठराविक कालावधीनंतर नष्ट करावे लागते. त्यासाठी रीतसर परवानगी घेणे आवश्यक असते. जी दारून नष्ट केली जाणार आहे, ते करताना कॅमेऱ्यामध्ये दिसेल अशा पद्धतीने त्याचे चित्रीकरण करणे बंधनकारक आहे. तसेच त्या नष्ट केलेल्या दारूचा व बाटल्यांच्या काचांचा कोणालाही त्रास होणार नाही याची दक्षता घेणे अतिशय महत्त्वाचे असते. त्याची विल्हेवाट निर्जन स्थळी कराव्या अशा साधारणता शासनाच्या गाईडलाईन्स आहेत. मात्र वरीलपैकी नियमांचे पालन होताना किंवा झालेले दिसत नाही. नष्ट केलेली दारू व दारूच्या बाटल्या प्रशासकीय इमारतीच्या पाठीमागील चिंचेच्या झाडाजवळ वाहनाच्या पार्किंगसाठी नियोजित असलेल्या खुल्या जागेवर व डांबरीकरण रस्त्यावर त्या बाटल्या फोडल्या आहेत. त्यामुळे त्या बाटल्यांचा खच त्या भागात पडला असून रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्यांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
कौटुंबिक न्यायालयास हे मंदिर !
ज्या ठिकाणी दारूच्या बाटल्यांची विल्हेवाट लावलेली आहे. त्या लगतच पीडित महिलांना न्याय देण्यासाठी शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेले कौटुंबिक न्यायालय आहे. तसेच २० फुटांच्या अंतरावरच महादेव मंदिर व मारुती मंदिर आहे. त्यामुळे या ठिकाणी जिल्ह्यातील महिला न्यायालयात तर शहरातील भाविक महिला मंदिरात दर्शनासाठी दररोज सकाळ संध्याकाळ येत असतात. मात्र या घमघमाटामुळे त्यांना मळमळीच्या त्रासाला नाईलाजाने सामोरे जावे लागत आहे.
अभिलाषी सुगंधामुळे न पिताच अनेकजण झिंगाट !
प्रशासकीय इमारतीमधील अधिकारी व कर्मचारी शासकीय कामांसाठी त्यांच्या कार्यालयात सकाळी ९.४५ ते सायंकाळी ५.४५ वाजेपर्यंत काम करतात. यामध्ये पुरुषांसह महिलांचा देखील समावेश आहे. मात्र, या दारूच्या अभिलाषी दरवळलेल्या सुगंधामुळे न पिणारे देखील सुगंधानेच मादक दारूच्या नशेत झिंगाट होत आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाने खुले हवेवर तरंगणारे बिअर बार सुरू केल्याने अनेकांची दारूची तलफ सुगंधावरच भागत आहे हे खेदाने नमूद करावेसे वाटते.
काचेची विल्हेवाट कशी लावणार ?
नमूना तपासासाठी आणलेली व पकडलेली दारु नष्ट करण्याच्या नावाखाली काचेचा ढिगारा निर्माण केला आहे ? वास्तविक पाहता अत्यंत वर्दळीच्या व शासकीय कार्यालयाच्या मुख्यालया नजीक अशा पद्धतीने दारूच्या बाटल्यांचा ढिगारा करून संबंधित अधिकाऱ्यांनी काय साध्य केले ? विशेष म्हणजे हे काच अतिशय टोकदार असून कोणाच्या पायात भोसल्यास ते जबर जखमी होऊ शकतात. तर वाहनाच्या टायरमध्ये घुसल्यास वाहन झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे या काचेची विल्हेवाट कशी लावणार ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.