पवनचक्कीतील तांब्याच्या तारा लुटणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात;टाटा सुमो वाहनासह एकूण १२,२३,४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग परिसरातील गंधोरा पाटी येथे
दि. १९ मार्च रोजी नळदुर्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत गंधोरा पाटी येथे रिन्यू कंपनीच्या पवनचक्कीवर गंभीर स्वरूपाचा दरोडा घालण्यात आला होता. काही अज्ञात चोरट्यांनी पवनचक्कीचे रखवालदारांना बांधून ठेवून त्यांना मारहाण केली आणि पवनचक्कीच्या आतील वायरमधून तांब्याच्या तारा जबरदस्तीने चोरी करून नेल्या. या घटनेबाबत नळदुर्ग पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा क्रमांक ८८/२५ नोंदवून भारतीय संहितेच्या कलम ३०९(६), ३२४(५), ३(५) अन्वये जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी करून गुन्हा लवकरात लवकर उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळ आणि परिसराची पाहणी केली. तांत्रिक साधने आणि पारंपरिक गोपनीय माहितीच्या आधारे काही महत्त्वाचे पुरावे गोळा करण्यात आले.
याच अनुषंगाने मिळालेल्या माहितीच्या आधारे १) सुनिल कालीदास शिंदे (वय ३६, रा. दत्तनगर पारधी पिढी, ढोकी, ता. धाराशिव), २) सरदार उर्फ गणेश शंकर काळे (रा. कन्हेरवाडी, ता. कळंब, जि. धाराशिव, सध्या रा. येळंब घाट, ता. जि. बीड), ३) राहुल लाला शिंदे (वय २९, रा. दत्तनगर पारधी पिढी, ढोकी, ता. धाराशिव) यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले.
चौकशीदरम्यान तिन्ही आरोपींनी सदर गुन्हा स्वतःसह आणखी आठ आरोपींनी मिळून केल्याची कबुली दिली. तसेच त्यांनी याआधी धाराशिव जिल्ह्यात घडलेल्या अशाच स्वरूपाच्या आणखी सहा गुन्ह्यांची कबुली दिली आहे. या सर्व गुन्ह्यांमध्ये एकूण ७२१ फूट लांबीची तांब्याची तार आणि गुन्ह्यात वापरलेले टाटा सुमो वाहन असा एकूण १२,२३,४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ताब्यात घेतलेले आरोपी व मुद्देमाल पुढील कारवाईसाठी नळदुर्ग पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेच्या या यशस्वी कारवाईमुळे पवनचक्की कंपन्यांनी समाधान व्यक्त केले असून, या लुटमार करणाऱ्या टोळीचा बंदोबस्त झाल्यामुळे जिल्ह्यातील सुरक्षाव्यवस्थेला बळकटी मिळाली आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक संजय जाधव व अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या नेतृत्वात सपोनि सुदर्शन कासार आणि त्यांच्या पथकातील सपोफौ वलीउल्ला काझी, पोलीस हवालदार शौकत पठाण, प्रकाश औताडे, जावेद काझी, फहरान पठाण, दयानंद गादेकर, पोअं योगेश कोळी, चालक नितीन भोसले यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.