काँग्रेसचे युवा नेते ऋषिकेश मगर यांचा शिवसेनेत प्रवेश; असंख्य पदाधिकाऱ्यांनीही बांधले शिवबंधन
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर तालुक्यातील काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला असून काँग्रेसचे आक्रमक युवा नेते ऋषिकेश मगर यांनी सोमवारी दि.१६ सप्टेंबर शिवसेनेत प्रवेश केला. मुंबईतील मातोश्री निवासस्थानी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते व धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर तसेच आमदार कैलास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मगर यांनी शिवबंधन बांधले यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते शाम पवार,सागर इंगळे आदी उपस्थित होते.
ऋषिकेश मगर हे गेल्या अनेक वर्षांपासून राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून, सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून लढा देणारा आक्रमक कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे. प्रशासनातील अधिकाऱ्यांमध्ये त्यांचा चांगलाच दबदबा असून, त्यांच्या प्रवेशामुळे तालुक्यातील शिवसेनेला मोठे बळ मिळाले असल्याचे पक्षांतर्गत मानले जात आहे. शिवसैनिकांमधूनही त्यांच्या या निर्णयाचे जोरदार स्वागत करण्यात आले.
या प्रवेशावेळी तालुक्यातील अनेक प्रभावी पदाधिकाऱ्यांनीही काँग्रेसला रामराम ठोकत शिवबंधन बांधले. यात सरपंच सुजित हंगरकर, सरपंच गौरीशंकर कोडगिरे, प्रताप निंबाळकर, मोहन जाधव यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांचा समावेश होता. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसह तालुक्यातील राजकीय समीकरणांवर या प्रवेशाचा दूरगामी परिणाम होणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे.यावेळी तुळजापूर तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.