ऋषिकेश मगर यांच्यासह असंख्य पदाधिकाऱ्यांचा ठाकरे सेनेत प्रवेश भाजपला अप्रत्यक्ष धक्का ; निम्न तेरणा संघर्ष समितीचे प्रमुख जगदीश पाटीलही शिवबंधनात

ऋषिकेश मगर यांच्यासह असंख्य पदाधिकाऱ्यांचा ठाकरे सेनेत प्रवेश

भाजपला अप्रत्यक्ष धक्का ; निम्न तेरणा संघर्ष समितीचे प्रमुख जगदीश पाटीलही शिवबंधनात

धाराशिव : ज्ञानेश्वर गवळी

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तुळजापूर तालुक्यातील राजकीय समीकरणांना मोठा कलाटणी देणारी घटना मंगळवारी मुंबईच्या मातोश्री निवासस्थानी घडली. काँग्रेसचे युवा नेते ऋषिकेश मगर यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधत ठाकरे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला. या मोठ्या प्रवेशामुळे भाजपला अप्रत्यक्ष धक्का बसला असून तालुक्यात नवे राजकीय गणित उभे राहणार आहे.

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे पुत्र व जिल्हा बँकेचे संचालक सुनील चव्हाण यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी काँग्रेसमधील मोठा गट अस्वस्थ बनला होता. या गटाला भाजपमध्ये आणण्यासाठी प्रयत्न झाले, मात्र “भाजपमध्ये न जाता विरोधकांना सक्षम टक्कर देणाऱ्या पक्षात काम करायचे” या भूमिकेवर कार्यकर्ते ठाम राहिले. अखेर खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत हा गट ठाकरे सेनेत दाखल झाला.

प्रवेश करणाऱ्यांमध्ये तालुक्यातील अनेक सरपंच, माजी सरपंच, बाजार समिती संचालक व ग्रामपंचायत सदस्यांचा समावेश आहे. काटीचे सरपंच सुजित हंगरकर, वडगाव काटीचे सरपंच गौरीशंकर कोडगिरे, उद्योजक मोहन जाधव, वाडीबामणीचे उपसरपंच अमर माने, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक ॲड रामचंद्र ढवळे, कोरेवाडीचे सरपंच सुरेश कोकरे, वडगाव लाखचे सरपंच बालाजी चंदनशिवे, तसेच माजी सरपंच दिलीप सावंत, शहाजी देवगुंडे, प्रभाकर घोगरे, सिद्धनाथ मदने यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवबंधन बांधले.

या प्रवेशावेळी धाराशिव जिल्हा शिवसेना समन्वयक शाम पवार, जिल्हा संघटक राजअहमद पठाण, उपजिल्हाप्रमुख जितेंद्र कानडे, शहर प्रमुख राहुल खपले, तसेच पदाधिकारी जगन्नाथ गवळी, अर्जुन साळुंखे, सागर इंगळे, सुनील जाधव, चेतन बडगर, कृष्णात मोरे, बालाजी पांचाळ आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निम्न तेरणाचे लढवय्येही शिवबंधनात

तुळजापूर तालुक्यासोबतच धाराशिव येथील निम्न तेरणा संघर्ष समितीचे प्रमुख जगदीश पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांसह मातोश्रीवर शिवबंधन बांधून ठाकरे सेनेत प्रवेश केला. या वेळी गोविंद गरड, विक्रम भोसले, बाळासाहेब पाटील, निखिल वाघमारे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले.

या प्रवेशावेळी शिवसेनेचे पदाधिकारी मुकेश पाटील, खंडू शिंदे, दत्ता चव्हाण, नेताजी गायकवाड, अश्विन पाटील, सुभाष कळसुले, बालाजी सगट, महादेव ढोले, चंदू ताकमोगे, सुधीर गायकवाड, पल्लव पाटील, धनराज कुंभार, जैनुद्दीन सय्यद आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या व्यापक प्रवेशामुळे तुळजापूर व धाराशिव तालुक्यात ठाकरे गटाची संघटनात्मक ताकद लक्षणीयरीत्या वाढली असून, भाजपसमोर नवे आव्हान उभे राहिल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!