जिल्हा तंबाखूमुक्त करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

जिल्हा तंबाखूमुक्त करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

धाराशिव : प्रतिनिधी

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत आणि सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने (जाहिरात प्रतिबंध,व्यापार विनियमन आणि वाणिज्य उत्पादन, पुरवठा आणि वितरण) कायदा, २००३ च्या कलम ४ च्या तरतुदींनुसार जिल्ह्यातील सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान आणि तंबाखू सेवनास सक्त मनाई करण्यात आली आहे.जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी या संदर्भात आदेश जारी करत प्रभावी अंमलबजावणीचे निर्देश दिले आहेत.

या आदेशानुसार,जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था,खाजगी आस्थापना, तसेच सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान आणि तंबाखू सेवनास बंदी घालण्यात आली आहे.तसेच,१८ वर्षाखालील मुलांना तंबाखूजन्य पदार्थ विकण्यास मनाई करण्यात आली आहे.शिक्षण संस्थांच्या १०० मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विक्रीस देखील बंदी घालण्यात आली आहे.

तसेच,सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांनी “धुम्रपान निषेध क्षेत्र” म्हणून फलक लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत.नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून २०० रुपयेपर्यंत दंड वसूल केला जाईल.हा दंड कोषागार कार्यालयाच्या ठराविक लेखाशिर्षाखाली जमा करावा लागणार आहे.

जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाच्या राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कक्षात दरमहा अहवाल सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.या आदेशाची अंमलबजावणी सर्व शासकीय आणि खाजगी संस्थांमध्ये काटेकोरपणे करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!