धाराशिव शहरात रंगपंचमी आणि नागपूर घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा रूट मार्च.
धाराशिव, : प्रतिनिधी
दि. 18 मार्च 2025 रंगपंचमीच्या दिवशी तसेच नागपूरमध्ये घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने धाराशिव शहरात पोलिसांनी रूट मार्च काढला. शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी हा रूट मार्च आयोजित करण्यात आला होता. हा रुट मार्च धाराशिव पोलीस स्टेशनपासून सुरू होऊन छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत संपन्न झाला. रूट मार्चचा मार्ग पोलीस स्टेशन येथून निघून कलेक्टर बंगला समोरून, काळा मारुती चौक, माऊली चौक, आझाद चौक, विजय चौक, तालीम चौक, शम्स चौक, धाराशिव मर्दीनी कमान, देशपांडे स्टेडियम, पाथ्रुड चौक आणि ताज महाल टॉकीज समोरून छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत होता. या मार्चाद्वारे पोलिसांनी शहरातील प्रमुख भागांतून आपली उपस्थिती दर्शवली आणि नागरिकांना सुरक्षिततेची हमी दिली. रंगपंचमीचा सण आणि नागपूरमधील अलीकडील घटनांच्या पार्श्वभूमीवर, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी ही खबरदारी घेतली. शहरातील नागरिकांनीही या उपक्रमाचे स्वागत केले असून, शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांच्या प्रयत्नांना पाठिंबा दर्शवला आहे.या रूट मार्चाच्या आयोजनामुळे धाराशिव शहरात सणाच्या उत्साहासोबतच सुरक्षिततेचे वातावरणही निर्माण झाले आहे.