तुळजापूरमध्ये रस्त्यावर विक्री करणाऱ्या विक्रेत्यांसाठी कधी होणार मार्किंग
पोलीस व नगरपरिषद प्रशासनाकडून व्यापारी व विक्रेत्यांच्या बैठकीत निर्णय
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर शहरातील मंदिरासमोर विविध साहित्य विक्री करणाऱ्या महिला विक्रेता तसेच हातगाडी चालकांसाठी भवानी रोडवर पांढरेपट्टे मारून मार्किंग करण्यात येणार असून शहरातील विक्रेते व्यापारी व नागरिकांच्या आयोजित बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
तुळजापूर शहरात गेल्या पंधरा दिवसापासून पोलीस प्रशासन व नगरपालिका प्रशासनाने वाहतूक शिस्त लागण्यासाठी तसेच रस्त्यावर असलेले अतिक्रमण काढण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर बँरेकेटींग केली आहे. दरम्यान या बॅरेकेटिंग मुळे अनेक विक्रेत्यांचा त्रास होत असल्याने सर्वांची मते जाणून घेण्यासाठी गुरुवारी सायंकाळी तुळजापूर पोलीस स्टेशन येथे बैठक आयोजित केली होती. या बैठकीस उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश देशमुख, नगर पालिकेचे मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार, माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी, पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपिन शिंदे, राजेश्वर कदम, महेश गवळी, अमोल कुतवळ, मयूर गाडवे उपस्थित होते. यावेळी विक्री करणाऱ्या महिलांनी पोलिस प्रशासनामुळे आमचे आतोनात आर्थिक नुकसान होत आहे. अतिक्रमण न काढता भांगडी विक्री, काटीवाले विक्रीवाल्या महिलांसाठी जागा निच्छीत करावी अशी महिलांची मागणी आहे.
पोलिस प्रशासनाच्या बाजूने
मंदिरासमोरील जागा मोकळीच राहणार
सुरक्षिततेच्या दृष्टीने तुळजाभवानी मंदिर हे बी कॅटेगरीत येत असल्याने मंदिरासमोरील परिसर हा मोकळा ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीकोनातून मंदिरासमोर कोणत्याही विक्रेत्यास बसता येणार नसल्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ निलेश देशमुख यांनी पोलिस ठाण्यात आयोजित केलेल्या बैठकीत यावेळी सांगितले.
फुटपाटवर विक्री करणाऱ्या महिलांची उपासमार होत असून अनेकांचे हातावरचे पोट आहे त्यामुळे त्याच जागी मंदिरासमोर विक्री करण्यासाठी जागा द्यावीअशी असंख्य महिलांनी मागणी केली. दरम्यान यावेळी डॉ. निलेश देशमुख यांनी शहराची लोकसंख्या वाढत असून सध्या मंदिरामध्ये गर्दी नसलेल्या दिवशी देखील २० हजार च्या आसपास भाविक येत आहेत. मंगळवार, शुक्रवार, रविवार व सुट्टीच्या दिवशी हीच गर्दी ५० हजारापर्यंत जात आहे. शहरात येणाऱ्या गाड्यांची ही संख्या वाढली आहे. तसेच काही वर्षात रेल्वे सुरू झाल्यानंतर भाविकांची संख्या वाढणार आहे त्यामुळे सर्वांनी शिस्त पाळली पाहिजे असे आवाहन केले. अनेक विक्रेते बेशिस्तपणे बसत आहेत, त्यामुळे येण्या जाणाऱ्या लोकांना मोठी अडचण होत आहे.
भवानी रोडच्या मध्यभागी पट्टे मारून दोन फूट जागा विक्रेत्यांना देण्यात येईल अतिक्रमण विक्रेत्यांसाठी ओळखपत्र देणार – न.प. मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार
नगरपालिकेत एक काउंटर उघडले जाणार असून तिथे जाऊन सर्व विक्रेत्यांनी आपली नोंदणी तेथे करावी जेणेकरून सर्व विक्रेत्यांना ओळखपत्र देता येईल.
तुळजापूर साठी स्वतंत्र पोलीस स्टेशन – डॉ. निलेश देशमुख
तुळजापूर साठी स्वतंत्र पोलीस स्टेशन होणार असून ग्रामीण आणि शहरासाठी वेगवेगळे पोलीस स्टेशन निर्माण होणार आहेत. तसेच शहरासाठी एक वाहतूक शाखा ही तयार करणार असून शहरातील वाहतुकीस शिस्त लागण्यासाठी मदत होणार असल्याचे सांगितले.
विश्वनाथ कॉर्नर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील बॅरेकटिंग काढावे – व्यापाऱ्यांची मागणी
दरम्यान प्रशासनाने केलेली बॅरिकेटींग हे विश्वनाथ कॉर्नर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या रोडवर देखील करण्यात आले आहे. ह्या रोडवरील दुकाने ही जास्त करून ग्रामीण भागाशी निगडित आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना बॅबेरेकटिंग मुळे मोठी अडचण होत आहे त्यामुळे बँरैकेटींग काढण्याची मागणी तेथील व्यापाऱ्यांनी केली आहे.
त्यांनी अतिक्रमण काढून घ्यावे, दुकानासमोरही पट्टा मारून मार्किंग करण्यात येत आहे त्या पट्ट्याच्या पुढे दुकान आल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचे देशमुख
यांनी यावेळी सांगितले. या बैठकीसाठी शहरातील अनेक प्रतिष्ठित नागरिक राजकीय सामाजिक कार्यकर्ते व्यापारी व विक्रेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.