नळदुर्ग शेतजमिनीच्या बोगस खरेदीखत प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
नळदुर्ग येथील शेतजमिनीच्या बोगस खरेदीखत प्रकरणी तुळजापूरचे अमोल शिवाजीराव जाधव (शिवसैनिक शिंदे गट) यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत त्यांनी अझ्झान नय्यरपाशा जागीरदार, जुब्बेरपाशा सज्ञ्जदमिया जागीरदार, सय्यद याकुब सज्जादमियाँ जागीरदार, सादिक आयुब शेख, अमीर अब्दुल मजीद शेख आणि दस्तुर जी.एन. शेख यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.
तक्रारीनुसार, सर्वे/गट क्रमांक २०५ मधील २ हेक्टर क्षेत्राच्या शेतजमिनीचे बोगस खरेदीखत करून शासनाचा महसूल बुडविण्यात आला आहे. सदर जमीन ही रहिवासी प्रयोजनासाठी अकृषिक घोषित करण्यात आली होती, परंतु खरेदीखतामध्ये ती बागायत असल्याचे दाखवून खोटेपणा करण्यात आला आहे. यामध्ये तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांचाही समावेश असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
अमोल जाधव यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणाची प्रत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूलमंत्री, पालकमंत्री, जिल्हा मुद्रांक अधिकारी, तहसीलदार आणि दुय्यम निबंधक यांनाही पाठविण्यात आली आहे.