धाराशिव जिल्हाधिकारी;कीर्ती किरण पुजार यांची नियुक्ती
तुळजाभवानी मंदिरात भ्रष्टाचाराचे आरोप वेळोवेळी समोर येतात. नव्या जिल्हाधिकाऱ्यांना ही ‘शुद्धीकरणाची मोहीम’ हाती घ्यावी लागणार!
धाराशिव : ज्ञानेश्वर गवळी
धाराशिव जिल्ह्याच्या नव्या जिल्हाधिकाऱ्यांची उत्सुकता अखेर संपली असून, राज्य सरकारने रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांची धाराशिवचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांची बदली सोलापूर महानगरपालिकेत आयुक्त म्हणून करण्यात आल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून या पदासाठी नवे नाव निश्चित होण्याची प्रतीक्षा होती.
कीर्ती किरण पुजार: एक सक्षम प्रशासक
कीर्ती किरण पुजार हे 2017 बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी यूपीएससी परीक्षेत 115 वी रँक मिळवत प्रशासनात प्रवेश केला. त्यांचे आतापर्यंतचे कार्यकाळ पाहता, ते एक कर्तव्यदक्ष आणि अनुभवी अधिकारी असल्याचे दिसून येते. त्यांनी रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून तीन वर्षे काम केले असून, त्यांच्या कार्यकाळात अनेक महत्त्वपूर्ण विकास प्रकल्प राबवले गेले.
धाराशिवसाठी नवी जबाबदारी
धाराशिव जिल्हाधिकारी म्हणून ही त्यांची पहिलीच नियुक्ती असून, नव्या जबाबदारीसाठी त्यांना तत्काळ कार्यभार स्वीकारण्यास सांगण्यात आले आहे. येत्या दोन दिवसात औपचारिकरीत्या पदभार स्वीकारतील, अशी शक्यता आहे. जिल्हाधिकारी म्हणून त्यांच्या निवडीने धाराशिव जिल्ह्यातील नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली असून, त्यांच्या नेतृत्वाखाली प्रशासन कोणते नवे निर्णय घेतं, याकडे सर्वांचे लक्ष राहील.
जिल्ह्याच्या विकासासाठी नवी दिशा
धाराशिव जिल्ह्यात विविध क्षेत्रांतील विकास कामे, कृषी आणि पाणीपुरवठा प्रकल्प, तसेच नागरी सुविधांसंबंधी अनेक महत्त्वाचे निर्णय प्रलंबित आहेत. नवीन जिल्हाधिकारी म्हणून कीर्ती किरण पुजार यांची नियुक्ती झाल्याने या कामांना गती मिळण्याची शक्यता आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील विकास प्रक्रियेत नवे धोरणात्मक बदल होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
नव्या जिल्हाधिकाऱ्यांचे स्वागत
धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या बदलाच्या पार्श्वभूमीवर कीर्ती किरण पुजार यांची नियुक्ती सकारात्मक पाऊल मानले जात आहे. प्रशासनिक अनुभव आणि कार्यक्षमतेच्या जोरावर त्यांनी धाराशिव जिल्ह्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावावी, अशी जिल्हावासीयांची अपेक्षा आहे.
आव्हाने
– भ्रष्टाचाराचा बिमोड: जिल्हाधिकारी
कार्यालयात बोकाळलेल्या भ्रष्टाचाराला चाप लावणे ही पहिलीच परीक्षा असणार !
• तुळजाभवानी मंदिर विकास आराखडाः तब्बल २ हजार कोटींच्या विकास
आराखड्याला मंजुरी मिळवून प्रत्यक्ष काम सुरू करणे, ही मोठी जबाबदारी असेल.
– मंदिरातील गैरव्यवहार रोखणे:
तुळजाभवानी मंदिरात भ्रष्टाचाराचे आरोप वेळोवेळी समोर येतात. नव्या जिल्हाधिकाऱ्यांना ही ‘शुद्धीकरणाची मोहीम’ हाती घ्यावी लागणार!