ड्रग्स एक राक्षस,अमली पदार्थ विषयी एक जनजागृती !

ड्रग्स एक राक्षस,अमली पदार्थ विषयी एक जनजागृती !

ड्रग्सबद्दलच्या बातम्या, चर्चा सध्या तुळजापूर शहरवासीयांसाठी आता नित्याच्याच असतात आजच धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री मा.प्रतापराव सरनाईक यांनी सज्जड दम पोलीसांना ड्रग्स प्रकरणात दिला. परंतु ड्रग्स बद्दल नागरीकांना संपुर्ण माहीती मिळणे ही काळाची गरज बनली असुन त्यासाठीच हा लेख. उत्तेजकं, ओपिऑईड्स, मेफेड्रोन, फेंटानिल असे वेगवेगळे शब्द ड्रग्स तस्करीत कानावर पडत असतात. याचा अर्थ काय? या मादक पदार्थांमध्ये असं काय असतं, ज्याची सवय लागते? आणि या सेवनाचे शरीरावर, आयुष्यावर काय परिणाम होतात? त्यासाठीचा हा लेखनप्रपंच.

मुळात ड्रग्ज म्हणजे काय? तर ड्रग्स म्हणजे असे घटक वा पदार्थ ज्यांचा शरीरावर परिणाम होतो.

म्हणजे औषधं अशी ड्रग्स आहेत ज्यामुळे आजारी, वेदनांमध्ये असणाऱ्या लोकांना मदत होते.

Recreational Drugs ही लोकांद्वारे घेतली जातात कारण त्यांचं सेवन केल्यानंतर शरीरावर होणारे परिणाम या लोकांना आवडत असतात. यापैकी काही ड्रग्सच्या वापरांसाठी कायदेशीररित्या मान्यता देण्यात आलेली आहे. ती म्हणजे तंबाखू आणि अल्कोहोल. पण ती कोणाला विकत घेता येतील यासाठी नियम आणि कायदे करण्यात आलेले आहेत. कॉफीमध्ये असणारं कॅफीनही एकप्रकारचं रिक्रिएशनल ड्रगच आहे.

पण बहुतेक इतर ड्रग्स बेकायदेशीर आहेत. याशिवाय बाजारात असणाऱ्या काही औषधांचाही गैरवापर करून ती नशेसाठी वापरली जातात.

ड्रग्स काय करतात?
रिक्रिएशनल ड्रग्स ही डिप्रेसंट (Depressants) किंवा स्टिम्युलंट (Stimulant) प्रकारची असतात.
डिप्रेसंट्स मज्जासंस्थेचं (Nervous System) काम मंदावतात. परिणामी मेंदूकडे आणि मेंदूकडून जाणाऱ्या संदेशांची गती कमी होते.
त्यामुळे त्या व्यक्तीची सतर्कता, एखाद्या गोष्टीला वा कृतीला प्रतिक्रिया देण्याचा वेग मंदावतो.
डिप्रेसंटचं एक उदाहरण म्हणजे अल्कोहोल. दारू.

हेरॉईनही डिप्रेसंट आहे, आणि त्याचा वापर आणि विक्री बेकायदेशीर आहे.

या प्रकारच्या ड्रग सेवनाचा परिणाम यकृतावर होतो, मेंदूची हानी होते, मृत्यूही ओढवू शकतो.
तर दुसऱ्या प्रकारचे ड्रग्स असतात स्टिम्युलंट्स – उत्तेजकं…यामध्ये तुमच्या मज्जासंस्थेमधून जाण्याऱ्या संदेशांचं वहन वेगाने व्हायला लागतं

यामुळे तुम्ही अधिक अलर्ट होता, एखाद्या गोष्टीला प्रतिक्रिया देण्याचा तुमचा वेग वाढतो.

तंबाखूमध्ये असणारं निकोटिन, चहा-कॉफी – एनर्जी ड्रिंक्समध्ये असणारं कॅफीन ही उत्तेजकं आहेत.

कोकेन, एक्सटसी, अॅम्फेटामाईन्स ही बंदी असणारी उत्तेजकं – स्टिम्युलंट ड्रग्स आहेत. यामुळे तुम्हाला उत्साही, आत्मविश्वासपूर्ण वाटत असलं, तरी दुसरीकडे त्याचे यकृत आणि हृदयावर परिणाम होत असतात. स्मरणशक्ती – एकाग्रता कमी होण्यासोबतच मानसिक आरोग्याचे आजारही यामुळे सुरू होऊ शकतात.

ड्रग्सचं व्यसन कशामुळे लागतं?
आपल्या मेंदूमध्ये लाखो नसांचं जाळं असतं. यामधूनच संकेतांचं वहन होत असतं. यातलं एक नेटवर्क असं असतं जे आपल्याला आपण काही कृती केल्यानंतर चांगलं वाटणारी भावना निर्माण करतं. हे नेटवर्क कार्यान्वित होतं तेव्हा Nerve Cells म्हणजे चेतापेशींमधून डोपामिन स्त्रवतं आणि आपल्यामध्ये ती चांगलं वाटणारी – Feel Good भावना निर्माण होते.

ही चांगलं वाटण्याची भावना जागं करणाऱ्या शरीरातील नेटवर्क्सचा ताबा ड्रग्स घेतात. आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात डोपमिन स्त्रवतं. आणि मेंदूमध्ये ही चांगलं वाटायला लावणारी रसायनं – ‘Feel Good Chemicals’ साठतात. हेच असतं – High होणं.

हे सगळं पुन्हा अनुभवण्यासाठी पुन्हा पुन्हा या मादक पदार्थांच्या सेवनाची इच्छा निर्माण होते. या सेवनाचे किंवा सेवन केलेलं असतानाच्या काळातल्या कृतींमुळे वाईट परिणाम झाले तरी हे सेवन पुन्हा पुन्हा केलं जातं. यालाच व्यसन -Addiction म्हणतात.
ड्रग्सविषयी खूप गैरसमज आहेत. एक महत्त्वाचा गैरसमज म्हणजे, त्यांना असं वाटतं की त्याच्यामुळे आनंद मिळतो. खरंतर याच्यामुळे कुठलाच आनंद मिळत नाही. जो काही आनंद मिळत असेल, तो अगदी थोड्यावेळासाठी असतो. आणि त्याच्यासाठी खूप मोठी किंमत द्यावी लागते. आणि एकदा का याची सवय लागली, की नंतर विथड्रॉवल सिम्प्टम्सचा खूप त्रास होतो. त्यामुळे आम्हाला त्यांना हे सांगावं लागतं, की ड्रग्समुळे किंवा कुठल्याही व्यसनामुळे मिळणारा आनंद खूप तात्पुरता असतो आणि त्याच्यासाठी खूप मोठी किंमत द्यावी लागते. दुसरा एक गैरसमज म्हणजे, ड्रग्सचं सेवन केल्यावर आपलं टेन्शन जातं. टेन्शन तात्पुरतं विसरलं जातं. पण त्याचं जे कारण आहे ते मुळापासून जात नाही. आणि एकंदरीतच त्याच्यामुळे इतक्या समस्या निर्माण होतात, की खरंतर ड्रग्सच्या सेवनामुळे टेन्शन्स खूप वाढत असतात.

ड्रग्सचे शरीरावर परिणाम?
गोळी, इंजेक्शन वा नाकावाटे ओढून घेतलेल्या मादक पदार्थांमुळे प्रत्येक व्यक्तीच्या शरीरावर वेगवेगळे परिणाम होऊ शकतात.म्हणजे या ड्रग्सचा अंमल असताना योग्य-अयोग्याचं भान राहत नाही, नीट – सुसंगत विचार करता येत नाही, आपल्या क्रिया मंदावतात, धूसर दिसतं, Hallucinations म्हणजे प्रत्यक्षात नसणाऱ्या गोष्टींचे आभास होतात, आवाज येतात.
पण या अंमली पदार्थांच्या सेवनाचे शरीरावर दीर्घकालीन परिणामही होतात.यकृतावर परिणाम होतो. फॅटी लिव्हर, अल्कोहोलिक हेपेटायटिस, लिव्हर सिऱ्होसिस चा धोका निर्माण होतो. याशिवाय अल्सर, हृदयविकार, कर्करोग, उच्च रक्तदाब यांचाही धोका उद्भवतो. शरीराला अंमलाखाली राहण्याची सवय झाल्यास त्याचा परिणाम इतर वेळीही दिसून येतो. अशा व्यक्तींला एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करायला कठीण जातं, एकाग्रता राहत नाही. नैराश्य येऊन मानसिक आरोग्याच्या समस्याही यातून निर्माण होतात.

एखादी व्यक्ती अंमलाखाली असताना तिचा स्वतःच्या विचारांवर, कृतींवर ताबा नसतो. ही व्यक्ती हिंसक होण्याची शक्यता असते. यातूनच त्यांच्या आणि त्यांच्याभोवती असणाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.

अंमली पदार्थांमध्ये काय असतं ज्याची सवय लागते? याचे शरीरावर काय परिणाम होतात?
एकदा का व्यसन लागलं, ही वेगवेगळ्या प्रकारचे दुष्परिणाम जाणवायला लागतात. एकतर प्रचंड आर्थिक नुकसान. कारण पैसे खूप खर्च होत असतात. हे सगळं जे चाललेलं असतं ते बेकायदेशीर आहे. त्यामुळे हे लक्षात घ्यायला हवं की आपल्यावर या गोष्टीमुळे कायदेशीर पोलीस कारवाई होऊ शकते. करियर जाऊ शकतं. कारण जेव्हा ते व्यसनाच्या आहारी जातात. तेव्हा शाळा-कॉलेजात जाणं बंद होतं. गेले तरी अभ्यासात लक्ष लागत नाही. त्यामुळे पुढच्या सगळ्याच समस्या निर्माण होऊ शकतात. असं दिसून येतं की कुठल्याही प्रकारचं व्यसन केलं, तर शारीरिक, मानसिक, आर्थिक, कौटुंबिक, सामाजिक अशा खूप वेगवेगळ्या समस्या निर्माण होत असतात.

व्यसनं आणि व्यसनाधीनता याचे परिणाम फक्त त्या व्यक्तीवरच नाही तर तिच्या कुटुंबावरही होत असतात.

संपादक
ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर
मो.8888448841

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!