बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी ; डी मार्ट समोरील दुर्घटना, पोदार शाळेचा विद्यार्थीचा ट्रक अपघातात मृत्यू
धाराशिव : प्रतिनिधी
शाळेतून सायकलवर घरी निघालेल्या सहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याला भरधाव ट्रकने चिरडल्याने विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शहरातील छत्रपती संभाजी नगर-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर डी मार्टसमोर दि.१० डिसेंबर रोजी मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली आहे.


छ्त्रपती संभाजी नगर ते सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बायपासला पर्यायी रस्ता नसल्याने चिमुकल्याचा बळी गेला असून, या घटनेनंतर प्रशासनाविरोधात संताप व्यक्त होत आहे.मिळालेल्या माहितीनुसार पोदार शाळेत इयत्ता सहावीमध्ये शिकणाऱ्या एका तुळजापूर पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या सोनवणे पोलिस कर्मचाऱ्याचा मुलगा मंगळवारी दुपारी शाळा सुटल्यानंतर सायकलवरून शाळेतून घराकडे जात होता. तो डी मार्टसमोर आल्यानंतर सोलापूरहून छत्रपती संभाजी नगरकडे कांदा घेऊन जाणाऱ्या भरधाव ट्रकने (के ए १३ बी १७७३ त्याला जोरदार धडक दिली. विद्यार्थ्याला धडक दिल्यानंतर ट्रक रस्त्याखाली जाऊन पलटी झाला. या धडकेत विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला.