धक्कादायक प्रकार : तुळजापूरात अर्भक मृतदेह सापडला
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर शहरात शनिवारी दुपारी एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली. नळदुर्ग रोडवरील मंठाळकर मंगल कार्यालयाजवळील भटकी शाळेच्या गेटवर एका अर्भकाचा मृतदेह आढळून आला. अज्ञात व्यक्तींनी हे अर्भक तेथे ठेवून पलायन केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दुर्दैवाने या अर्भकावरून वाहन गेल्याने जागीच त्याचा चेंदा-मेंदा झाला. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून नागरिकांच्या भावना चांगल्याच चिघळल्या आहेत.
घटनाक्रम
शनिवारी दुपारी ३ ते ३.३० वाजण्याच्या दरम्यान हा प्रकार उघडकीस आला. परिसरातील नागरिकांनी रस्त्याच्या कडेला अर्भकाचा मृतदेह पाहताच संताप आणि दु:ख व्यक्त केले. त्यांनी तातडीने पोलीस प्रशासनाशी संपर्क साधला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बिटामलदार श्रीनिवास आरदवाड व पोलीस आमदार कोळेकर यांनी मृतदेह ताब्यात घेऊन उपजिल्हा रुग्णालय, तुळजापूर येथे पाठविला.
नागरिकांत संताप
या अमानवी कृत्यामुळे नागरिकांत तीव्र संतापाची लाट उसळली आहे. पुण्यभूमी तुळजापूरात अशा प्रकारची लाजिरवाणी घटना घडणे दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया स्थानिकांकडून येत आहे. परिसरातील नागरिकांनी या घटनेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली असून दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणीही केली आहे.
तपासाची चक्रे वेगाने
दरम्यान, तुळजापूर शहर व परिसरात पावसाचे प्रमाण वाढले असून पावसाच्या पाण्यात अर्भक किंवा अन्य काही पुरावे वाहून जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने तपास अधिक वेगाने सुरू केला आहे.
नागरिकांची अपेक्षा
सदर प्रकरणातील दोषींना गजाआड करून कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी नागरीकांतून होत आहे. तसेच, भविष्यात अशा अमानवी घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी प्रशासनाने काटेकोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.