अपसिंगा रोड परिसर उजळला
माजी नगरसेवक विनोद गंगणे यांचा पुढाकार
तुळजापूर : प्रतिनिधी
शहरातील अपसिंगा रोड परिसरातील वंदे मातरम नगर व तुळजामाता शाळा परिसरात पथदिवे बंद पडल्याने नागरिकांना अंधारात मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत होते. चोरीच्या घटनांची भीती कायम होती. या समस्येवर माजी नगरसेवक विनोद गंगणे यांनी पुढाकार घेत स्वखर्चातून दहा नवीन एलईडी बल्ब बसवले.
वंदे मातरम नगर भागात जवळपास ६० घरे असून ३०० ते ४०० नागरिक राहतात. अंधारामुळे नागरिकांना रात्रीच्या वेळी ये-जा करताना त्रास सहन करावा लागत होता. अनेक वेळा रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनधारकांनाही धोका जाणवत होता.
नागरिकांच्या मागणीनंतर गुरुवारी दहा एलईडी बल्ब बसवण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते जयकुमार पांढरे यांच्यासह स्थानिक नागरिक आदि उपस्थित होते.
परिसरातील नागरिकांनी त्यांच्या या सामाजिक उपक्रमाचे मनापासून कौतुक केले असून आता सुरक्षिततेसोबतच प्रकाशमय वातावरण निर्माण झाल्याची भावना व्यक्त केली.
“समस्या सोडविणे हे आपले सामाजिक कर्तव्य आहे. नागरिकांची सुरक्षितता सर्वात महत्त्वाची,” असे युवा नेते विनोद गंगणे यांनी तुळजापूरनामा न्युज शी बोलताना सांगितले.