अवैध मद्य विरोधी कारवाई; दोन जणांना अटक, दारूसह दुचाकी जप्त
येरमाळा : प्रतिनिधी
येरमाळा पोलिसांनी अवैध मद्यविक्री विरोधात केलेल्या कारवाईत दोन संशयितांना ताब्यात घेत दारूसह दुचाकी जप्त केली आहे. ही कारवाई दि. १२ सप्टेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास येरमाळा-बार्शी रोडलगत करण्यात आली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी सतिश कोडींबा चंदनशिवे (वय ३०) व अमोल मोतीराम चंदनशिवे (वय ३५, दोघे रा. शिराळा, ता. बार्शी, जि. सोलापूर) हे स्कुटी (क्र. एमएच- १२ आरएस-२४३०) वरून देशी-विदेशी दारू वाहतूक करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली. तपासादरम्यान आरोपींकडून एकूण ५९ सिलबंद दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या असून त्याची अंदाजे किंमत ७० हजार रुपये एवढी आहे.
दारूची ही वाहतूक विक्रीच्या उद्देशाने होत असल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे. या कारवाईनंतर येरमाळा पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले असून, त्यांच्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पुढील तपास येरमाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भालेराव हे करीत आहेत. अवैध मद्य वाहतूक रोखण्यासाठी पोलिसांनी उचललेले हे पाऊल कौतुकास्पद ठरत असून, परिसरातील अवैध दारू विक्रेत्यांमध्ये मात्र धडकी भरली आहे.