धाराशिव लाइव्हचे संपादक सुनील ढेपे यांना अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर
धाराशिव : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या एका गुन्ह्यात सहआरोपी बनवण्यात आलेले ‘धाराशिव लाइव्ह’चे संपादक सुनील ढेपे यांना धाराशिव जिल्हा न्यायालयाने अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश शंकर ठुबे यांनी हा निर्णय दिला. राजकीय दबावातून आपल्याला या प्रकरणात गोवण्यात आल्याचा युक्तिवाद ढेपे यांच्या वकिलांनी न्यायालयात केला,जो न्यायालयाने ग्राह्य धरला.
काय आहे प्रकरण?
सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ माने यांच्यावर विशाल छत्रे यांनी ६ मे रोजी तुळजापूर पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३५, ३३६, ३३७, ३४९, ३४० अन्वये गुन्हा दाखल केला होता. माने यांनी तुळजापूर ड्रग्ज प्रकरणी खोटा जबाब तयार करून तो प्रसिद्धीस दिला, ज्यामुळे आपली बदनामी झाली, असे छत्रे यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणात काही व्हॉट्सॲप ग्रुप्ससह ‘धाराशिव लाइव्ह’ या वेबपोर्टलचा उल्लेख करण्यात आला होता.
सुनिल ढेपे यांच्या वतीने ॲड.अमोल वरुडकर यांच्यामार्फत धाराशिव जिल्हा न्यायालयात धाव घेतली. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश शंकर ठुबे यांच्यासमोर झालेल्या सुनावणीत ॲड. वरुडकर यांनी जोरदार युक्तिवाद केला. “सुनील ढेपे यांनी केवळ आलेल्या प्रसिद्धीपत्रकावरून बातमी प्रसिद्ध केली आहे. ड्रग्ज प्रकरणी आवाज उठवल्यामुळेच राजकीय दबावामुळे पोलिसांनी त्यांना आरोपी केले आहे,” असे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.न्यायालयाने हा युक्तिवाद मान्य करत सुनील ढेपे यांचा अंतरिम अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला.