पंधरा हजार रुपयांची लाच स्वीकारताना पॅरामेडिकल वर्कर रंगेहात पकडला

पंधरा हजार रुपयांची लाच स्वीकारताना पॅरामेडिकल वर्कर रंगेहात पकडला

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दि.२५ मार्च रोजी (लाप्रवि) धाराशिव येथे मोठी कारवाई करत पंधरा हजार रुपयांची लाच स्वीकारताना पॅरामेडिकल वर्करला रंगेहात पकडले. या प्रकरणात आरोपी नरसिंग तुकाराम सूर्यवंशी (वय ५० वर्षे), जो सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग) कार्यालयात कंत्राटी पॅरामेडिकल वर्कर म्हणून कार्यरत आहे,

तक्रारीची पार्श्वभूमी

तक्रारदार हे आरोग्य विभागात लोहारा येथे पॅरामेडिकल वर्कर (कुष्ठरोग) म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा फेब्रुवारी आणि मार्च २०२५ महिन्यांचा पगार तसेच २०२३-२०२५ या आर्थिक वर्षातील टीए (प्रवास भत्ता) बिल प्रलंबित होते. हे बिल मंजूर करण्यासाठी आरोपी नरसिंग सूर्यवंशी याने २५,००० रुपयांच्या लाचेची मागणी केली. यावर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.

पडताळणी आणि सापळा रचला
तक्रारीची पडताळणी केल्यानंतर, लाचलुचपत विभागाने आरोपीवर नजर ठेवली. आज सकाळी सहाय्यक संचालक आरोग्य सेवा कार्यालयात तक्रारदारासोबत आरोपीने २७,००० रुपयांची लाच मागणी करत तडजोडीनंतर पहिला हप्ता म्हणून१५,००० रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. त्यानंतर लाप्रवि पथकाने सापळा रचला.

लाच स्वीकारताना रंगेहात अटक

आरोपी नरसिंग सूर्यवंशी याने तक्रारदाराकडून १५,००० रुपये स्वीकारले, त्याच क्षणी लाचलुचपत विभागाच्या पथकाने त्याला रंगेहात पकडले. त्याच्या अंगझडतीमध्ये १५,००० रुपयांची लाच रक्कम, ५ ग्रॅम वजनाची चांदीची अंगठी, अतिरिक्त ३०० रुपये रोख रक्कम आणि विवो कंपनीचा मोबाईल जप्त करण्यात आला.

आरोपीच्या घरझडतीला सुरुवात
पोलिसांनी आरोपीच्या निवासस्थानीही झडती सुरू केली असून अधिक पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. तसेच आरोपीचा मोबाईल तपासणीसाठी जप्त करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल आणि पुढील तपास
या प्रकरणी आरोपीवर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ च्या कलम ७ अ नुसार आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली सुरू आहे.

सापळा पथकातील अधिकारी आणि कर्मचारी
या कारवाईचे नेतृत्व पोलीस निरीक्षक विकास राठोड यांनी केले. त्यांच्यासोबत पोलीस उप अधीक्षक सिद्धाराम म्हेत्रे, पोलीस अधीक्षक संदीप आटोळे आणि अपर पोलीस अधीक्षक मुकुंद आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार नेताजी अनपट, सचिन शेवाळे, विशाल डोके, नागेश शेरकर, शशिकांत हजारे, प्रकाश भोसले आणि चालक दत्तात्रय करडे यांनी ही यशस्वी कारवाई केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!