तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय शासकीय होणार -आ. राणाजगजितसिंह पाटील
महाविद्यालयाच्या विकासासाठी नवी दिशा
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळ
श्री तुळजाभवानी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आता शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय होणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली आहे. उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
या महाविद्यालयाचे व्यवस्थापन आतापर्यंत श्री तुळजाभवानी मंदिर ट्रस्ट मार्फत केले जात होते. या अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांकडून वार्षिक फी ७० ते ८० हजार रुपये आकारली जात होती. मात्र, आता हे महाविद्यालय शासकीय होणार असल्याने फीमध्ये मोठी कपात होणार आहे.
शासकीय महाविद्यालय झाल्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. फीमध्ये आमूलाग्र बदल होणार असल्याने मध्यमवर्गीय व आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च अभियांत्रिकी शिक्षणाची संधी मिळणार आहे.
आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी फेसबुक लाइव्हद्वारे माहिती दिली की, येत्या शैक्षणिक वर्षापासून हे महाविद्यालय शासकीय होणार आहे. या निर्णयामुळे तुळजापूर आणि परिसरातील विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
शासकीय महाविद्यालय झाल्यामुळे शिक्षणाच्या गुणवत्तेत सुधारणा होईल तसेच महाविद्यालयाच्या पायाभूत सुविधांमध्येही मोठे बदल होण्याची अपेक्षा आहे. राज्य शासनाच्या निधीचा वापर करून आधुनिक प्रयोगशाळा, ग्रंथालय आणि इतर सुविधा उभारल्या जातील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंद आणि उत्साहाचे वातावरण पसरले आहे. आता शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय म्हणून तुळजापूरची ओळख अधिक मजबूत होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.