लोकशाही दिनाच्या माध्यमातून नागरिकांच्या तक्रारींचे तातडीने निवारण होण्यास मदत –
जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार
धाराशिव : ज्ञानेश्वर गवळी
नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी जिल्हास्तरावर दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आणि तालुकास्तरावर तिसऱ्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते.मुख्यमंत्री महोदयांच्या १०० दिवसाच्या कृती कार्यक्रमाच्या अनुषंगाने लोकशाही दिन हा उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्यात यावा व नागरिकांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण करावे.असे निर्देश जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी दिले.
आज ३ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात लोकशाही दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी श्री.पुजार बोलत होते.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष,पोलीस अधीक्षक संजय जाधव,अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन,निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव,उपजिल्हाधिकारी उदयसिंह भोसले,जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.चाकूरकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.चव्हाण,श्री.भंडे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरिदास, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री.माने, परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक विनोद भालेराव,शिक्षणाधिकारी अशोक पाटील,नगर पालिका प्रशासनचे जिल्हा सहआयुक्त अजित डोके,उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री.गोडभरले व श्री.गिरी,धाराशिव उपविभागीय अधिकारी संतोष राऊत,सरकारी कामगार अधिकारी सुधाकर कोनाडे व जिल्हा जलसंधारण अधिकारी श्री.महामुनी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
तहसीलदारांनी प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन करून नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करावे,असे शासनाचे आदेश आहेत जर त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी असेल,तर पुढील कामकाजाचा दिवस लोकशाही दिन म्हणून आयोजन करून नागरिकांच्या तक्रारींचे तालुका स्तरावर निराकरण करावे.असे पुजार यांनी सांगितले.
जिल्हास्तरीय लोकशाही दिनात अर्ज सादर करण्यापूर्वी संबंधित नागरिकांनी प्रथम तालुकास्तरीय लोकशाही दिनात आपली तक्रार नोंदवावी.जर समाधानकारक उत्तर न मिळाल्यासच जिल्हास्तरीय लोकशाही दिनात अर्ज सादर करावा.असे पुजार यावेळी म्हणाले.
लोकशाही दिनात न्यायालयीन प्रकरणे, राजस्व अपील,सेवाविषयक तक्रारी किंवा नियमानुसार ग्राह्य न धरण्यात येणाऱ्या अर्जांचा विचार होणार नाही.मात्र,इतर सर्व प्रकारच्या नागरी समस्यांचे तातडीने निराकरण करण्यासाठी प्रशासन तत्पर आहे.तालुकास्तरीय लोकशाही दिनाची व्यापक प्रसिद्धी करण्यात यावी तसेच सर्व संबंधित कार्यालय प्रमुखांनी स्वतः उपस्थित राहावे,असे श्री.पुजार यांनी सांगितले.
“लोकशाही दिन हा नागरिकांसाठी प्रशासनापर्यंत थेट पोहोचण्याचा प्रभावी मंच आहे.त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी आपल्या अडीअडचणी सोडवण्यासाठी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी केले.
शहरी भागात ज्या जागेवर अतिक्रमण केल्याच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी तेथील अतिक्रमण नगरपालिकेने तात्काळ काढावे व वारंवार अतिक्रमण करणाऱ्यांवर नगरपालिकेने एफआयआर दाखल करावे. त्या ठिकाणी कंपाऊंड उभारावे असे सांगून श्री.पुजार म्हणाले,काही जणांचे बँक खाते बँकांनी सीझ केले असेल तर त्यांच्या खात्यात योजनेचे मानधन जमा व्हावे यासाठी त्या नागरिकांचे जनधन खाते तात्काळ उघडण्यासाठी अग्रणी बँक मॅनेजरने लक्ष द्यावे,जेणेकरून शासनाच्या योजनेचे मानधन त्या लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करता येईल.लोकशाही दिनातील प्रत्येक अर्जावर संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने निर्णय घेऊन लोकशाही दिनातील अर्जाचे निराकरण करावे.ग्रामीण भागातून लोकशाही दिनात आलेल्या अर्जांवर संबंधित तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांनी चौकशी करून वस्तनिष्ठ अहवाल सादर करावा व संबंधितांना संबंधित अर्जदारांना न्याय देण्याच्या दृष्टीने पुढाकार घ्यावा,असे श्री.पुजार म्हणाले.
लोकशाही दिन या उपक्रमामुळे नागरिकांचे प्रश्न जलदगतीने मार्गी लागणार असून, शासन-प्रशासन व नागरिक यांच्यातील संवाद अधिक मजबूत होण्यास मदत होणार आहे.आजच्या लोकशाही दिनाला जिल्ह्यातून आलेले नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.जिल्हाधिकारी श्री.पुजार यांनी अर्ज घेऊन आलेल्या अर्जदाराकडून त्यांच्या तक्रारींची माहिती जाणून घेतली.