बघतोस काय रागानं…मैदान मारलंय वाघानं!सुनिलकुमार मुसळे

बघतोस काय रागानं…
मैदान मारलंय वाघानं!
सुनिलकुमार मुसळे

मागच्या आठवड्यात पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे म्हणाल्या,’मला बारामतीला आल्यावर अजितदादा यांच्याकडून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. त्यातील पहिली गोष्ट म्हणजे त्यांचा वक्तशीरपणा. आणि प्रत्येक गोष्टीतील दादांचा बारकावा, त्यांचं स्वतः लक्ष देण आणि बारामतीच्या विकासाशी असलेलं त्यांचं नातं.. मलाही अशा प्रकारचे काम बीड आणि मराठवाड्यात करायच आहे.’

पवार आणि मुंडे हे महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन ध्रुव. दोन वेगवेगळ्या विचारधारा.दोन वेगवेगळ्या पक्षीय विचारांची घराणी. मुंडे विरुद्ध पवार हा संघर्ष महाराष्ट्राने अनेकदा पाहिला आहे. मुंडे यांच्या बीड जिल्ह्यात त्यांना शह देण्यासाठी पवार घराण्याने अनेक माणसांना बळ दिलं तर पवार यांच्या खुद्द बारामतीला कधी काकडे, कधी तावरे, कधी जाचक अशी घराणी मुंडे कुटूंबाने जोडून ठेवली..

हे झालं राजकारण..राजकारणात अनेक घडामोडी घडल्या.आता राज्याच्या राजकारणात पवार आणि मुंडे एकाच मंत्रीमंडळात काम करत आहेत.. पण ज्यांनी ज्यांनी हा संघर्ष बघितला आहे त्यांना पंकजाताई यांच्या विधानाचे आश्चर्य वाटेल आणि अजितदादा पवार यांच्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला अभिमान वाटेल..

दादांच्यासोबत काम करताना मला आलेल्या काही घटनाची नुसती सहज नोंद घेत गेलो तर त्याचे पुस्तक होईल, एक नाही तर अनेक..

रात्रीचे साडेअकरा वाजलेत.सगळं आवरून मी झोपण्याच्या तयारीत आहे, अशावेळी माझा फोन वाजतो.. यावेळी कोणाचा फोन असेल असं म्हणून मी कॉल उचलतो..
तिकडून आवाज येतो..
“अजितदादांचा फोन आहे हाय का?”
“मी त्यांचा पीए बोलतोय.”
“अहो साहेब आमच्या गावाला जायला एसटी नाही. मी हिथं स्टॅन्डवर आहे. माझं बारीक पोरग सोबत आहे. अजून पाचसात माणसं आहेत हिथं तिकडं जाणारी गाडी न्हाय.. काय कराव आम्ही..?”
“ताई, दोन मिनीट थांबा.”असं म्हणून मी कॉल ठेवला. जिल्ह्याच्या एसटीच्या डीसीना कॉल केला आणि ही माहिती दिली. त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत त्या गावाला रात्री पावणेबारा वाजता एसटी सोडली..

घरी गेल्यावर त्या माऊलीचा फोन आला..
“दादा पोहोचली बर काय मी घरी..”

दादांनी एका सभेत माझा नंबर दिलेला.तेव्हा ही माऊली सभेत होती. तिनेही नंबर घेतलेला.. दादांच्या मला नेहमी सूचना. आलेला फोन ऐकून शक्य तेवढे ते काम मार्गी लावायचं..
मीही असं काम करू शकलो ते दादांचा रयतेप्रति असलेली माया जिव्हाळा बघून..

पंकजाताई म्हणाल्या ते खरं आहे..
‘दादांचे विकासासोबत एक नातं आहे..’

हे खरे आहे पण सोबतच दादांचं नातं महाराष्ट्रतल्या प्रत्येक रंजल्या गांजल्या माणसासोबत आहे..

महाराष्ट्राच्या राजकारणात लोकसभा निवडणुकीत दादांच्या पक्षाची पीछेहाट झाली तदनंतर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणार होता तेव्हा अनेक राजकीय पंडित, राजकारण अभ्यास करणारे भाष्यकार हे अजितदादा यांच्या संपलेल्या राजकारणावर कपोलकल्पित चर्चा करत होते. दादांच्या दहा बारा जागा तरी येणार काय? इथंपासून ते दादा बारामतीला निवडून येणार की नाही एवढ्या पातळीवरचे नरेटिव्ह सेट करण्यात आले होते. अजितदादासारख्या सातत्याने लोकांच्यात राहणाऱ्या लोकनेत्याबद्दलच्या अशा गोष्टी वाचताना माझ्यासह शेकडो लोकांना त्रास व्हायचा..पण यावेळी दादांच्या चेहऱ्यावर मात्र कोणतेही भाव नसतं. दादा फक्त आपली प्रामाणिक भूमिका जनतेला पोहोचवत होते.त्यासाठी रात्रदिवस प्रवास करत होते. त्यांना माहिती होतं आपलं नाणं अस्सल आहे. आपण जनतेला बांधील आहोत. आपली बांधीलकी जनतेसोबत आहे. कोणी काही म्हणो आपण आपली वाट चालत राहायची..

कोरोना काळात अगदी पेट्रोलपंपवाला पेट्रोल देत नाही म्हणूनही त्यांना फोन यायचे. कोणाच्या बाळंतीन बहिणीला पैसे नाहीत म्हणून दवाखान्यातून डिसचार्ज मिळेना म्हणून फोन यायचं.कोरोनाकाळात दादांच्यातील राज्यपालक जवळून बघायला मिळाला.. राज्यातील जनतेबद्दल असलेली कणव जवळून बघितली आणि आपण ज्याच्यासोबत काम करतोय तो माणूस किती मोठा आहे हे जवळून बघायला मिळालं, अभिमान वाटला..

नंतरच्या राजकीय घडामोडीत कोरोना काळात राज्याची काळजी वाहणाऱ्या आणि आजवरच्या राजकारणात अखंड सेवेत असलेल्या अजितदादा या लोकनेत्याला खलनायक ठरवण्याच्या प्रयत्न झाला. त्यासाठी काही कमर्शीयल कंपन्या आल्या.त्यांनी जुनी विधान नव्याने पसरवून दादांना अधिक खलपुरुष बनवले मात्र हा माणूस वरून कणखर मात्र आतून संवेदनशील आहे हे त्यांना समजले नाही..
महाराष्ट्रातल्या जनतेला समजले.. त्यांनी योग्य न्याय केला. जनता जनार्दनच्या दरबारात अजितदादा जिंकले.. याचा अनेकांना अभिमान तर अनेकांना राग आला. त्रास झाला. त्यावर दादांच्या विजयानंतर भावनिक झालेल्या एका उत्साही कार्यकर्त्यांने दिलेली घोषणा हिच महत्वाची प्रतिक्रिया.. तो म्हणाला होता..
             “बघतोस  काय रागान ? …
              मैदान मारल या वाघान”

-सुनीलकुमार मुसळे
स्वीय सहाय्यक,ना.अजितदादा पवार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!