आराधवाडी परिसरातील विकास कामांना पुजारी मंडळाचा विरोध – विपीन शिंदे
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर शहर विकास आराखड्यात केवळ आराघवाडी, वाहनतळ व मंदिर परिसरात विकास कामे प्रस्तावित करण्यात आली असून शहरात कसल्याही प्रकारची विकास कामे प्रस्तावित नसल्याने विकास आराखडा म्हणजे पुजारी व्यवसाय संपवण्याचा घाट असल्याचा आरोप पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपीन शिंदे यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे. विकास आराखड्यास पुजारी मंडळाचा विरोध असल्याचे सांगून या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा शिंदे यांनी दिला आहे.
पुजारी मंडळ मंगळ कार्यालयात आयोजित पत्रकार परिषद पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपीन शिंदे बोलत होते. यावेळी संचालक प्रा. धनंजय लोंढे, अण्णासाहेब रोचकरी यांची उपस्थिती होती. शासनाने १८६५ कोटी रुपयांच्या विकासा आराखड्याची घोषणा केली असून भूसंपादनाची कामे प्रगतीपथावर आहेत. शहरात विविध ठिकाणी भाविक सुविधा केंद्र, दर्शन मंडप तसेच रामदरा तलावात १०८ फुटी मूर्ती, बगीचा, बोटींग आदी विविध विकासकामे प्रस्तावित आहेत. मात्र विकास आराखड्यातील आराघवाडी भागातील विकास कामांना पुजारी मंडळाचा विरोध असून आराघवाडी भागातील विकास कामांमुळे शहरातील पुजारी व्यवसाय मोडीत काढण्याचा डाव
भाविकांसाठी नाही स्वच्छतागृह
विकास आराखड्यात शहरातील विकास कामासाठी ३२४ कोटी रूपये, आराघवाडी परिसरातील विकास कामासाठी ३५४ कोटी रूपये, भूसंपादनासाठी ३३८ कोटी रुपये तर मंदिरासाठी १५५ कोटी रूपये खर्च प्रस्तावित करण्यात आला आहे. मात्र विकास आराखड्यात भाविकांच्या सोयीसाठी शहरात स्वच्छतागृह बांधण्यात येणार नसल्याने विकास आराखडा भाविक व पुजाऱ्यांसाठी उपयोगी नसल्याचे पुजारी मंडळाने म्हटले आहे.
पुजारी वर्गाचा व्यवसाय धोक्यात येणार असल्याचा आरोप शिंदे यांनी केला आहे. या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा शिंदे यांनी दिला आहे. दरम्यान, आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम पत्रिकेत पुजारी मंडळाचे नाव टाकण्यात आले असले तरी पुजारी मंडळाचा सत्कार सोहळ्याला विरोध असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे आमदार पाटील तसेच मंदिर संस्थानने आराधवाडी परीसरातील विकास कामे रद्द करण्यात आल्याचे लेखी पत्र पुजारी मंडळाला देण्यात आल्यानंतरही आराधवाडीतील कामे कायम असल्याने शिंदे यांनी संताप व्यक्त केला आहे.