मराठ्यांचा ऐतिहासिक विजय, सरकारकडून संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांच्या मागणी मान्य !
मुंबई : मराठा आरक्षणासाठी गेल्या अनेक दिवसांपासून आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसलेले मराठा संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या मागण्यांवर अखेर सरकारने शिक्कामोर्तब केले आहे. राज्य सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतल्याची अधिकृत माहिती उपसमितीकडून देण्यात आली आहे.सरकारकडून एका तासाच्या आत शासन निर्णय काढून सर्व मागण्या मान्य करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे मराठा समाजाचा दीर्घकाळाचा लढा यशस्वी ठरला असून हा ऐतिहासिक विजय मानला जात आहे.मनोज दादा जरांगे पाटील यांनी शासन निर्णय प्रसिद्ध झाल्यानंतर आपले उपोषण मागे घेण्याची घोषणा केली आहे. त्यांनी समाज बांधवांना उद्देशून असेही सांगितले की, “उपोषण मागे घेतल्यानंतर रात्री नऊ वाजेपर्यंत संपूर्ण मुंबई खाली करण्यात येईल. कोणीही मुंबईत थांबणार नाही.”सरकारच्या निर्णयामुळे उपोषणस्थळी उत्साह आणि समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे. हजारो मराठा बांधवांनी जल्लोष केला.मराठा आरक्षणासाठी सुरू झालेला हा संघर्ष आता एका ऐतिहासिक टप्प्यावर पोहोचला असून, समाजाच्या संयम व एकतेमुळे हा विजय शक्य झाल्याचे मत मनोज दादा जरांगे पाटील यांनी व्यक्त केले आहे.