कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली अतिवृष्टीग्रस्त भागातील पीक नुकसानीची पाहणी

कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली अतिवृष्टीग्रस्त भागातील पीक नुकसानीची पाहणी

शेतक-यांच्या बांधावर जाऊन शेतक-यांशी साधला संवाद.

धाराशिव : ज्ञानेश्वर गवळी

जिल्ह्यात अनेक ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.या परिस्थितीची गंभीर दखल घेत कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दि,१६ ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील विविध भागांचा दौरा करून शेतकऱ्यांची पीक नुकसानीच्या परिस्थितीची प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.भेटीदरम्यान त्यांनी येत्या ३ दिवसांमध्ये पिकांचे पंचनामे करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारली होती.राज्यात पुन्हा एकदा मान्सून सक्रीय झाला आहे.राज्यात मुसळधार पाऊस पडत आहे.त्यामुळे अनेक जिल्ह्यांना पावसाचा फटका बसत आहे.काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसांमुळे नद्यांनापूर आले आहे. जिल्ह्यातही जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे तेरणा व मांजरा नदीलापूर आला आहे.तसेच जिल्ह्यातील काही भागातील शेतीचे नुकसान झाले आहे.

जिल्ह्यात आलेल्या अतिवृष्टीची तात्काळ दखल घेऊन कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी जिल्ह्यातील विविध नुकसानग्रस्त भागांचा दौरा करून पाहणी केली.यामध्ये प्रामुख्याने वाशी तालुक्यातील घोडकी या गावामध्ये प्रत्यक्ष शेतात जाऊन पिकांच्या नुकसानीची पाहणी केली.खोंदला ता.कळंब या गावात अतिवृष्टी पुरामुळे वाहून गेलेल्या शेतकरी कुटुंबास भेट दिली. तसेच पीक नुकसानीचे पाहणी केली.वाशी शहरातील काही दुकांनामध्ये पावसाचे पाणी शिरल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या ठिकाणीही त्यांनी पाहणी केली. दौऱ्यादरम्यान कृषी मंत्री भरणे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांचे प्रश्न, अडचणी व तातडीच्या गरजा समजून घेतल्या.शेतकऱ्यांनी शेती पिकांचे झालेले नुकसान,जनावरांसाठी चाऱ्याची कमतरता तसेच घरांचे झालेले नुकसान याबाबत माहिती दिली.

यावेळी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी जिल्हा प्रशासन,कृषी विभाग व महसूल अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे पूर्ण करून मदत कार्य गतीमान करण्याचे निर्देश दिले. शेतकऱ्यांना विमा हप्ता,पीक कर्ज पुनर्नियोजन,बियाणे व औषधांची उपलब्धता यासाठीही आवश्यक ती पावले उचलण्याचे आश्वासन त्यांनी दिले.भरणे यांनी पाण्यातून व चिखलातून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जात पीक नुकसानीची पाहणी करून शेतक-यांना आधार दिला.

कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, “शेतकरी हा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे.निसर्गाच्या प्रकोपामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे,या कठीण प्रसंगी शासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू. नुकसानभरपाई व आवश्यक मदत तातडीने केली जाईल.तसेच शेतकऱ्यांना हवामान बदलाशी लढा देण्यासाठी पिक विमा, हवामान माहिती व पिक बदल संदर्भात मार्गदर्शन यासारख्या उपाययोजना केल्या जातील.असे त्यांनी भेटीदरम्यान उपस्थित शेतकऱ्यांना आश्वस्त केले.

“शेतकऱ्यांच्या दु:खात शासन त्यांच्या पाठीशी आहे.मदत आणि दिलासा पोहोचवणे हे आमचे कर्तव्य आहे,” असे आश्वासन कृषीमंत्री श्री.भरणे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दिले.पीक नुकसानी पाहणी दरम्यान माजी आमदार राहुल मोटे,कृषी व महसूल अधिकारी उपस्थित होते.दौऱ्यादरम्यान बाधित शेतकरी बांधवांनी कृषीमंत्री भरणे यांचेशी संवाद साधत आपल्या समस्या मांडल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!