गेल्या ३२ वर्षांपासून प्रलंबित असलेला एम.फिल. अर्हता धारकांचा प्रश्न सोडविल्याबद्दल विद्यापीठ विकास मंच व शिवाजी विद्यापीठ एम.फिल. आघाडी यांच्या वतीने मंत्री चंद्रकांत पाटील यांचा सत्कार उत्साहात संपन्न
कोल्हापूर, १४ ऑगस्ट : गेल्या ३२ वर्षांपासून प्रलंबित असलेला एम.फिल. अर्हता धारकांचा प्रश्न सोडविल्याबद्दल विद्यापीठ विकास मंच व शिवाजी विद्यापीठ एम.फिल. आघाडी यांच्या वतीने उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा सत्कार समारंभ हॉटेल रेडियंट या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. विद्यापीठ विकास मंचचे प्रदेशाध्यक्ष प्रा. एन. डी. पाटील, डी. आर. मोरे, डॉ. धमकले तसेच निमंत्रक ॲड. स्वागत परुळेकर यांच्या हस्ते माझा सत्कार करण्यात आला.
एम.फिल. चा अनेक वर्षांपासूनचा प्रश्न सोडवण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान व यूजीसी सचिव मनीष जोशी यांच्या सहकार्याने महाराष्ट्र शासनात संबंधित खात्याचा मंत्री म्हणून चंद्रकांत पाटील यांनी सदैव सकारात्मक भूमिका घेतली आहे. भविष्यात एम.फिल. अर्हताधारक प्राध्यापकांना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही याची ग्वाही देताना, अर्थमंत्र्यांकडेही यासाठी योग्य पाठपुरावा केला जाईल, असा विश्वास सत्काराला उत्तर देताना पाटील यांनी व्यक्त केला. तसेच, भविष्यातील प्राध्यापक भरती व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती लवकरच होईल, अशी माहिती यावेळी त्यांनी दिली.
यावेळी व्यवस्थापन परिषद सदस्य सिद्धार्थ शिंदे व पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर मधील प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.