मुलगा होत नाही म्हणून पतीकडून पत्नीचा खून;पती धनंजय माळी याला पोलिसांनी घेतले ताब्यात
तुळजापूर : प्रतिनिधी
तुळजापूर तालुक्यातील काटगाव येथे मुलगा होत नाही म्हणून पतीने कोयत्याने वार करून पत्नीचा खून केल्याची घटना दि.१९ वार गुरुवारी सायंकाळच्या सुमारास घडली.
धनंजय भारत माळी याने मुलीच होतात, मुलगा होत नाही याचा राग मनात धरून आपली पत्नी गोजर धनंजय माळी वय २८ हिचा गळा दाबून कोयत्याने वार करून खून केला. याबाबत मृताची बहीण शीलाबाई हरिदास माळी यांनी नळदुर्ग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. धनंजय हा पत्नी गोजरबाई हिला नेहमी तुला मुलीच होतात, मुलगा होत नाही म्हणून मारहाण करून शारीरिक व मानसिक त्रास देत होता. त्याने गुरुवारी सायंकाळी याच कारणावरून मारहाण केली व गळा दाबून कोयत्याने वार करून खून केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.गोजरबाई यांना तीन लहान मुली आहेत. यातील दोन मुली शाळेला गेल्या होत्या. हे कृत्य करून तो गावातील चौकामध्ये फिरत होता व मी पत्नीला ठार केल्याचे बोलत होता, अशी चर्चा ऐकावयास मिळाली. शुक्रवारी सायंकाळी काटगाव येथे गोजरबाईवर अंत्यसंस्कार करण्यात आले.याबाबत माहिती मिळताच नळदुर्ग पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पती धनंजय माळी याला ताब्यात घेऊन शुक्रवारी तुळजापूर न्यायालयात हजर केले. याबाबत अधिक तपास नळदुर्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष गीते हे करीत आहेत.