तुळजापूर : प्रतिनिधी
येथील जिजामाता माध्यमिक कन्याप्रशालेला संजीवनी संस्थेच्या उपक्रमशील शाळा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सोमवारी दुपारी जिजामाता कन्याप्रशालेत माजी जि प सदस्य काशिनाथ बंडगर, व्हाईस ऑफ मीडियाचे जिल्हा कार्याध्यक्ष गोविंद खुरुद व संस्थेचे संचालक सिद्राम तट्टे यांच्याहस्ते संस्थापक संचालक अशोकराव मगर यांच्याकडे स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन शाळेला सन्मानित करण्यात आले. जिजामाता कन्याप्रशाला विद्यार्थिनीला प्रोत्साहित करण्यासाठी शाळेमध्ये विविध प्रकारचे उपक्रम राबवते यामुळे मुलींमध्ये विविध उपक्रम करण्याची शैली प्राप्त होते तसेच मागील तीन वर्षापासून शाळा सामान्यज्ञान स्पर्धेत सहभागी होऊन मोठ्या प्रमाणावर विद्यार्थिनीला पुरस्कार मिळत आहेत म्हणून शाळेला उपक्रमशील शाळा पुरस्काराने गौरविण्यात येत आहे असे सिद्राम तट्टे यांनी सांगितले. संस्थापक संचालक अशोक मगर यांच्या मार्गदर्शनाखाली जिजामाता कन्या शाळेची दिवसेंदिवस प्रगती होत आहे त्यामुळे हे यश शाळेला मिळाले आहे असे मनोगत गोविंद खुरुद यांनी व्यक्त केले. संस्थापक संचालक अशोक मगर यांनी या पुरस्काराचे सारे श्रेय शाळेच्या मुख्याध्यापिका मिटकरी व शिक्षक कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांचे आहे असे त्यांनी सांगून शाळेतील गुणवंत विद्यार्थिनी व शिक्षक यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक राहुल कोकरे तर आभार शिक्षक कुंभार यांनी मानले.