श्री तुळजाभवानी मातेचा मंचकी निद्रेस प्रारंभ
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्रोत्सवाची पूर्वतयारी म्हणून मानली जाणारी मंचकी निद्रा या परंपरेचा शुभारंभ रविवार दि. १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आला. संध्याकाळच्या अभिषेक पूजनानंतर देवीला गाभाऱ्यातून मोठ्या थाटामाटात शेजगृहातील चांदीच्या पलंगावर विसावण्यात आले. “आई राजा उदो उदो” च्या घोषात वातावरण दुमदुमून गेले.
मंचकी निद्रेचा हा सोहळा पारंपरिक रितीरिवाजांनुसार मोठ्या भक्तिभावाने पार पडला. यासाठी सकाळपासूनच मंदिर परिसरात तयारी सुरू होती. सेवेकरी पलंगे कुटुंबीयांनी चांदीचा पलंग घासून-पुसून स्वच्छ धुवून घेतला. पलंगावर नव्या नवार पट्ट्या बांधून घेण्यात आल्या तर नवीन गाद्या व अंथरुण पलंग सज्ज ठेवण्यात आला.
गाद्यांचा कापूस पिंजण्याचा मान यंदाही परंपरेप्रमाणे मुस्लिम समाजातील पिंजारी कुटुंबीयांकडे होता. शमशोद्दीन पिंजारी यांनी पत्नीच्या सहकार्याने हा मान पार पाडला. सकाळी गादीसाठी लागणारा कापूस परिसरातील आराधी महिलांनी पारंपरिक गीतांच्या तालावर पिंजला. त्यावेळी मानकरी जनार्दन निकते, शकुंतला निकते, मंगेश निकते, रवी निकते, नंदकिशोर सरवदे, लक्ष्मीकांत सरवदे यांनी गाद्या शिवून घेतल्या. त्यांना नागेश कुलकर्णी यांनी मदत केली.
सायंकाळी खंडोबा देवस्थानचे पुजारी वाघे यांनी आणलेला भंडारा देवीच्या मूर्तीला लावण्यात आला. त्यानंतर दोन धार्मिक विधी संपन्न झाले. त्यानंतर देवीला सिंहासनावरून पलंगावर विराजमान करण्यात आले.
या सोहळ्यावेळी मंदिर संस्थानचे व्यवस्थापक तहसीलदार माया माने, धार्मिक व्यवस्थापक अमोल भोसले, जयसिंग पाटील, नागेश शितोळे यांच्यासह मंदिर संस्थानचे अधिकारी, कर्मचारी, पुजारी, सेवेकरी व मानकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, मंचकी निद्रा नऊ दिवसांची असणार असून सोमवार दि. २२ सप्टेंबर रोजी पहाटे तुळजाभवानी माता पुन्हा सिंहासनावर विराजमान होणार आहे.