शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील अश्रू पाहून मन हेलावलं; सरकारने मदत केली नाही तर रस्त्यावर उतरनार – आमदार कैलास पाटील यांचा इशारा
धाराशिव : प्रतिनिधी
जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि ढगफुटीसदृश पावसाने शेतकऱ्यांचे होत्याचे नव्हते करून टाकले आहे. शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त होत असताना सरकारने अजूनही ठोस मदत जाहीर न केल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार कैलास पाटील यांनी कळंब तालुक्यातील नुकसानग्रस्त भागांचा पाहणी दौरा करून शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.
पाहणीदरम्यान शेतकऱ्यांच्या डोळ्यांतले अश्रू आणि चेहऱ्यावरचे दुःख पाहून आमदार पाटील भावुक झाले. यावेळी त्यांनी तीव्र शब्दात सरकारला इशारा दिला – “मायबाप सरकारने तात्काळ ठोस मदत केली नाही तर आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल.”
शेलगाव (ज), सातेफळ, वाघोली आदी गावांना भेट देऊन आमदार पाटील यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. ते म्हणाले की, “ढगफुटीमुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतं ओसाड झालीत, जनावरांसाठी चारा नाही, अनेकांची घरे व संसार वाहून गेले. शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आला आहे. तरीसुद्धा शासन यंत्रणा झोपेत आहे.”
सरकारच्या भूमिकेवर संताप व्यक्त करताना आमदार पाटील म्हणाले, “आणखी किती हानी झाल्यावर शासनाच्या डोळ्यांतलं पारणं फूटणार? जिल्ह्यातील शेतकरी संकटात असताना सरकार मात्र बघ्याची भूमिका घेत आहे, हे अतिशय दुःखद आणि संतापजनक आहे.”
त्यांनी शासनाला तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी केली. अन्यथा तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारा दिला.
मदतीत दुजाभाव?
ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीत इतर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना मदत मिळाली, मात्र धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी अद्याप मदतीपासून वंचित आहेत. या संदर्भात आमदार पाटील म्हणाले, “शेतकऱ्यांप्रती सरकारचं हे दुजाभावी धोरण संतापजनक आहे. मदत देताना धाराशिवला का वगळलं? हे सरकार शेतकऱ्यांचं किती ढोंगी प्रेम करतं, हे जनतेला चांगलंच कळलं आहे.”