भाविकांना सौजन्याची वागणूक देऊन यंत्रणांनी आपल्या जबाबदाऱ्या वेळेत पार पाडाव्यात -जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार
शारदीय नवरात्र महोत्सव तयारीचा आढावा
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी साडेतीन शक्तीपीठापैकी एक पूर्ण पीक असलेली आई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवास दि. २२ सप्टेंबरपासून मोठ्या उत्साहात सुरू होत आहे.परंपरेनुसार दि.१४ सप्टेंबर रोजी देवींची मंचकी निद्रा होणार असून,२२ सप्टेंबर रोजी घटस्थापना होईल.नवरात्र महोत्सव काळात भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांशी कर्मचाऱ्यांनी सौजन्याने वागून यंत्रणांवर सोपविण्यात आलेल्या जबाबदाऱ्या वेळेत पार पाडाव्यात.असे निर्देश श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी दिले.
बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष,अपर जिल्हाधिकारी ज्योती पाटील,उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख,तहसीलदार अरविंद बोळंगे,तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया माने,महंत तुकोजी बुवा, भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमराजे कदम, पाळीकर पुजारी मंडळाचे विपिन शिंदे, उपाध्य पुजारी मंडळाचे अनंत कोंडो तसेच विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी पुढे बोलताना म्हणाले की,नवरात्र काळात भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनाने विविध उपाययोजना आखल्या आहेत.विद्युत विभागाकडून २४ तास अखंडित वीजपुरवठा,सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्रमुख रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची कामे,तसेच मराठी,कन्नड आणि तेलगू भाषेत दिशादर्शक फलक बसविण्यात येत आहेत.आरोग्य विभागाकडून सहा प्रमुख मार्गांवर २२ प्रथमोपचार केंद्र साथरोग नियंत्रण पथके व १० बाईक ॲम्ब्युलन्स सज्ज ठेवण्यात येतील.नगर परिषदेकडून स्वच्छता मोहिम, शुद्ध पिण्याचे पाणी,वॉच टॉवर, विश्रांतीगृहे आणि अग्निशमन वाहनांची सोय करण्यात येणार आहे.सिंगल युज प्लास्टिकवर बंदी घालण्यात येत असून,उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल.सुरक्षेसाठी १०२ सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जात असून, भवानी कुंड परिसरात शौचालयांची सोय केली जात असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
अन्न व औषध प्रशासन विभागाकडून त्यांचे अन्न सुरक्षा अधिकारी कार्यरत राहतील. त्यांनी खाद्यपदार्थांवर काटेकोर देखरेख ठेवावी असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले की, भाविकांच्या सुरक्षिततेसाठी २ हजार पोलिस तैनात राहतील तसेच स्वतंत्र वाहतूक नियोजन पथके कार्यरत राहतील.
“यावर्षीचा शारदीय नवरात्र महोत्सव स्वच्छता संकल्पनेवर आधारित असेल.देवीच्या दर्शनासाठी आलेला प्रत्येक भाविक सुखरूप घरी जाईपर्यंत त्याची काळजी घेणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे.”असे ही यावेळी म्हणाले.
यावेळी विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी शारदीय नवरात्र महोत्सवाच्या दृष्टीने सोपवण्यात आलेल्या जबाबदाऱ्या आणि त्याच्या प्रगतीबाबतची माहिती दिली.