लोकसहभागातून कामे केल्यास गाव समृद्ध होण्यास वेळ लागणार नाही -आ. कैलास घाडगे पाटील
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान कार्यशाळा
धाराशिव : ज्ञानेश्वर गवळी
दि.११ सप्टेंबर राज्याचा नव्हे तर देशाचा विकास हा गावावरच अवलंबून असतो.त्यामुळे गावस्तरावर आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून सर्वांगीण विकास करणे आवश्यक आहे.तो विकास करताना सरपंच आणि ग्रामसेवक तथा ग्रामविकास अधिकारी यांनी आपसातील सर्व मतभेद विसरून एका नव्या उमेदीने गावच्या विकासासाठी झटून कामे करीत गावयाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करावेत. मात्र,ती कामे करताना सर्व ग्रामस्थांना विश्वासात घेत लोकसहभाग व लोकचळवळीतून केल्यास गावचा विकास होऊन प्रत्येक गाव समृद्ध होण्यास वेळ लागणार नाही.असे प्रतिपादन आमदार कैलास घाडगे पाटील यांनी केले.
आज धाराशिव शहरातील सिध्दाई मंगल कार्यालयात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले, त्यावेळी ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते.यावेळी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनक घोष,जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष नेताजी पाटील,उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) तुकाराम भालके,उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) अनंत कुंभार,मुख्य लेखा व वित्त अधिकारी सचिन इगे,उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालकल्याण देवदत्त गिरी,उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज राऊत,टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचे गणेश चादरे,आदर्श गाव जेकेकुरवाडीचे सरपंच अमर सुर्यवंशी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना आमदार घाडगे पाटील म्हणाले की,मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान १७ सप्टेंबरपासून राज्यात राबविण्यात येणार आहे.त्यासाठी शासनाच्या विविध विभागांच्या योजना राबवून समृद्ध गाव करणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे ग्रामपंचायतचा कारभार पारदर्शक असणे आवश्यक आहे.त्यामुळे ग्रामसेवक अर्थात ग्रामविकास अधिकारी यांनी देखील ग्रामपंचायतचे रेकार्ड व्यवस्थितपणे ठेवणे गरजेचे आहे.यामध्ये सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन करीत ते म्हणाले की, सगळ्यांचा सहभाग हा निश्चितच उपयोगी ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.विशेष म्हणजे आपण आणि खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या फंडातून ग्रामपंचायतला निधी उपलब्ध करुन देण्यात येईल,असे आश्वासन त्यांनी दिले.
जिल्हाधिकारी श्री.पुजार म्हणाले की, जिल्ह्यातील ५३२ गावांमध्ये आपले सरकार केंद्राची जाहिरात काढलेली आहे.त्या माध्यमातून प्रत्येक गावांनी आपले गाव जोडून घ्यावे.तसेच ग्रामस्थांना आवश्यक असलेल्या सर्व प्रमाणपत्राचे वितरण तात्काळ करण्यासह त्या त्या गावातील युवक व युवती यांनी त्या माध्यमातून उद्योजक बनावे,असे आवाहन त्यांनी केले.
श्री.पुजार पुढे म्हणाले की,जिल्ह्यामध्ये मुबलक प्रमाणात उद्योग सुरु करण्यासाठी वाव आहे.आधुनिक पद्धतीने शेती करण्यासह त्यासाठी आवश्यक असलेल्या शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा.तसेच पशुपालन व इतर लघु उद्योग सुरु करावेत. याबरोबरच प्रत्येक ग्रामपंचायतीने जास्तीत जास्त विकास कामे करुन आपल्या गावचा विकास साधावा.विशेष म्हणजे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाअंतर्गत आवश्यक त्या सर्व निकषांची पूर्तता करीत राज्यस्तरावरील बक्षिसे खेचून आणून गावचा लौकिक वाढवावा,असे आवाहन त्यांनी केले.
तसेच प्रत्येक सरपंच, ग्रामविकास अधिकारी व मंडळ अधिकारी यांनी आठवड्यातून किमान एक वेळेस गावस्तरावर जनता दरबार घेऊन गावातील तक्रारी सोडवाव्यात.जर हा उपक्रम राबविला तर एक देखील तक्रार शिल्लक राहणार नसल्याचे श्री.पुजार यांनी सांगितले.
प्रत्येक ग्रामपंचायतने वेबसाईट सुरू करावी.तसेच शाळेला दर्जेदार सुविधा देण्यात येणार असल्याचे सांगून श्री.पुजार म्हणाले की,स्टेटससाठी सीएसआर निधी आणि लोकसहभागाची चळवळ वाढवून जास्तीत जास्त पाणंद रस्ते करावेत. त्याबरोबरच समृद्ध गाव अभियानाअंतर्गत जास्तीत जास्त विकास कामे राबवून जिल्ह्याचा लौकिक वाढवावा असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी नेताजी पाटील,महेंद्र बांगर,गणेश चादरे,मनोज राऊत,सचिन इगे,गुरुनाथ भांगे,मेघनाथ पवार,सरपंच अमर सुर्यवंशी, निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव आदींसह इतरांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यशाळेस जिल्हाभरातील सरपंच, उपसरपंच,सदस्य,सर्व तालुक्याचे गट विकास अधिकारी, जिल्हा परिषदेचे सर्व विभाग प्रमुख,ग्रामसेवक तसेच तालुकास्तरीय सर्व विभाग प्रमुख आदीसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी राष्ट्रीय पंचायत पुरस्कार ग्रामपंचायत धारूर,खानापूर, भंडारवाडी आणि कावलदरा (ता. धाराशिव) तसेच राज्य आदर्श ग्रामपंचायत आदर्श अधिकारी पुरस्कार विजयसिंह नलावडे,भारत सोनवणे आणि नेताजी सांगवे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.