उपायुक्त शरद उघडे यांनी केले
सावली केअर सेंटरचे कौतुक
“सावली”चा दुसरा टप्पा लवकरच पूर्ण करण्याचा तनुजा व विकास देशमुख यांचा संकल्प
आजवर साडे सात हजार कॅन्सर रुग्ण ,नातेवाईकांनी घेतला लाभ
मुंबई, दि:- मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे उपायुक्त श्री. शरद उघडे यांनी श्री. विकास देशमुख आणि सौ. तनुजा देशमुख संचालन करत असलेल्या “सावली केअर सेंटर” या सामाजिक कॅन्सरग्रस्त रुग्णनिवास प्रकल्पाला भेट दिली.
सेंटर करीत असलेल्या कार्याची शरद उघडे यांनी प्रशंसा केली. सेंटरच्या नियोजित उपक्रमांन सहकार्य करण्याची ग्वाही दिली. यावेळी सेंटरचे संचालक विकास देशमुख व सौ. तनुजा देशमुख यांनी ५०० कॅन्सर रुग्णांची निवास व्यवस्था करणारा सावली केअर सेंटरचा दुसरा टप्पा लवकरच पूर्ण करण्याचा संकल्प केला. यावेळी सेंटरच्यावतीने शरद उघडे यांचा सत्कार करण्यात आला.
सावली केअर सेंटर हे केवळ एक नाव नाही, तर आरोग्यसेवा आणि निवारा आणि भोजन शोधत मुंबईत येणाऱ्या हजारो रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी हक्काचा आधार आहे.अनेक कॅन्सर रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबांना टाटा रुग्णालयाजवळ राहण्यासाठी घर मिळत नाही.त्यांना रस्त्यावर, फुटपाथवर पावसात, उन्हात, वाऱ्यात राहावं लागतं.पोषक आहार न मिळाल्याने आणि अस्वच्छतेमुळे अनेक दुर्दैवी घटना घडतात.या समस्येवर कायमस्वरूपी उपाय शोधण्यासाठीच चैतन्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून सावली केअर सेंटरची उभारणी करण्यात आली आहे.
सध्या सावलीमध्ये 50 लोकांची राहण्याची उत्कृष्ट व्यवस्था उपलब्ध आहे.दररोज स्वच्छ धुतलेली बेडशीट व रुग्णांना आवश्यक उत्कृष्ट दर्जाचे साहित्य,अत्यंत स्वच्छ व सुरक्षित परिसर, सकस व पौष्टिक जेवणाची निशुल्क व्यवस्था,मोफत Wi-Fi सुविधा,दररोज सायंकाळी सामूहिक आरती,ठराविक वेळेसाठी वातानुकूलित व्यवस्था,आवडीची पुस्तके वाचण्यासाठी छोटेखानी लायब्ररी , वैद्यकीय उपचारासाठी आवश्यक असलेला खर्च विविध संस्था शासकीय योजना यामधून उपलब्ध करून देण्यासाठी व्यक्तिगत काउंसिलिंग आणि पाठपुरावा करणे आदी कार्य सावली केअर सेंटर करते.
“सावली केअर सेंटरच्या” माध्यमातून गेल्या सहा वर्षांमध्ये साडेसात हजार पेक्षा जास्त रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांनी या निवास व्यवस्थेचा लाभ घेतला आहे.सावलीच्या यशस्वी संचलनासाठी श्री. विकास देशमुख आणि सौ. तनुजा देशमुख यांचे शरद उघडे यांनी अभिनंदन केले.