पत्रकार सुनील ढेपेंच्या समर्थनार्थ महाविकास आघाडी मैदानात; कारवाई झाल्यास आंदोलनाचा इशारा

पत्रकार सुनील ढेपेंच्या समर्थनार्थ महाविकास आघाडी मैदानात; कारवाई झाल्यास आंदोलनाचा इशारा

तुळजापूर – ‘धाराशिव लाईव्ह’चे संपादक सुनील ढेपे यांच्यावर कारवाई करण्याच्या कथित प्रयत्नांविरोधात आणि त्यांना मिळत असलेल्या धमक्यांविरोधात तुळजापूर शहर व तालुक्यातील महाविकास आघाडी आणि घटक पक्ष आक्रमक झाले आहेत. ढेपे यांची पत्रकारिता दाबण्याचा प्रयत्न केला जात असून, हा लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर हल्ला आहे, असे म्हणत महाविकास आघाडीने या संपूर्ण प्रकरणाचा निषेध केला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे एक निवेदन तुळजापूर तहसीलदारांमार्फत सादर करण्यात आले आहे.

महाविकास आघाडीने निवेदनात म्हटले आहे की, पत्रकार सुनील ढेपे हे ‘धाराशिव लाईव्ह’ या चॅनलच्या माध्यमातून निर्भीडपणे पत्रकारिता करत आहेत. मात्र, काही दिवसांपासून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू असून, काही लोकांकडून त्यांना धमकीवजा वक्तव्ये केली जात आहेत. लोकशाही मार्गाने काम करणाऱ्या पत्रकारावरील हा अन्याय सहन केला जाणार नाही, असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

आंदोलनाचा इशारा

जर पत्रकार ढेपे यांच्यावर दबाव टाकून कारवाई करण्यात आली, तर याविरोधात मोठे आंदोलन उभारले जाईल, असा इशारा महाविकास आघाडीने दिला आहे. कोणत्याही पत्रकारावर दबाव तंत्राचा वापर केला जाऊ नये आणि त्यांना त्यांचे स्वातंत्र्य अबाधित ठेवून लोकशाही मार्गाने पत्रकारिता करू द्यावी, अशी विनंतीही या निवेदनात करण्यात आली आहे.

हे निवेदन जिल्हाधिकारी, धाराशिव यांच्यासाठी असून त्याच्या प्रती उपविभागीय पोलीस अधिकारी आणि तुळजापूर पोलीस निरीक्षक यांनाही देण्यात आल्या आहेत. निवेदनावर जिल्हा काँग्रेसचे कमिटीचे अध्यक्ष कदम – पाटील, शिवसेना शहर प्रमुख राहुल खपले, माजी नगरसेवक नागनाथ भांजी, शेख तौफिक  यांच्यासह महाविकास आघाडीच्या अन्य पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!