अक्षय ऊर्जा निर्मिती ठरणार राष्ट्रउद्धारक
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
आपल्या देशासह संपूर्ण जगभरात टेरीफ वाढी मुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीबाबत खल होताना दिसत आहे. आपल्या देशापुरते बोलायचे झाल्यास रशियाकडून होणारी तेल खरेदी या सगळ्याच्या मुळाशी असल्याचे प्रथमदर्शनी दिसते. कच्च्या तेलाच्या निर्मितीची केंद्रे सीमित असल्यामुळे जगभरात ही सुंदोपसुंदी दिसून येते आहे. यावर कायमस्वरूपी पर्याय म्हणजे ज्वलनशील इंधन अथवा वायू प्रज्वलित इंधन यांना सक्षम पर्याय शोधणे. तूर्तास विजेचा वापर जास्तीत जास्त वाढवणे हा सुवर्ण मार्ग दिसत आहे. परंतु ऊर्जा निर्मितीमध्ये आपण तितके सक्षम आहोत का? या प्रश्नाचे उत्तर शोधणे देखील अत्यावश्यक ठरते.
ज्या पद्धतीने स्वयंपाक घरातील उपकरणांपासून ते अगदी दुचाकी, चार चाकी वाहनांपर्यंत विद्युत ऊर्जेचा वापर वाढत आहे ते पाहता निर्मिती आणि वापर यांच्यात समप्रमाण दिसून येत नाही. ऊर्जा निर्मिती आणि ऊर्जा पारेषण क्षेत्रातील तज्ञांच्या मते पारंपारिक विद्युत ऊर्जा निर्मितीवर अवलंबून न राहता विद्युत ऊर्जा निर्मितीचे अन्यमार्ग वापरणे ही काळाची गरज आहे. इंधन म्हणून कच्च्या तेलावरती अवलंबून न राहता विद्युत ऊर्जा वापरणे. आणि विद्युत ऊर्जेत देखील जास्तीत जास्त पुनर्वापरयोग्य ऊर्जा वापरणे हे राष्ट्र उद्धारक कार्य ठरेल.
तूर्तास पारंपारिक विद्युत ऊर्जा निर्मिती सोबत जल ऊर्जा, पवन ऊर्जा आणि सौर ऊर्जा यांच्याद्वारे ऊर्जा निर्मितीला हातभार लागत आहे. असे असले तरी देखील पारंपारिक पद्धतीने कोळसा दहन करून विद्युत निर्मिती केली जात आहे. या पद्धतीमध्ये निर्माण होणारी राख ही उपजाऊ शेत जमिनींसाठी शत्रू ठरते. अनेक विद्युत निर्मिती केंद्रातून निर्माण होणाऱ्या राखेमुळे हजारो एकर शेतजमीन नापीक झाल्याची अनेक उदाहरणे समोर आहेत. म्हणूनच पुनर्वापरायोग्य उर्जेला हरित ऊर्जा असे देखील संबोधले जाते. या ऊर्जेचा वापर वाढविल्याने देशभरातील पर्यावरणात असणाऱ्या हवेचा दर्जा उंचावला जाईल. हरित ऊर्जेमुळे ऊर्जा निर्मिती करिता सामान्य शेतकऱ्यांचा हातभार लागेल. त्यांच्या शेतजमिनीवर पवनचक्की किंवा सौर ऊर्जेची पॅनल उभारल्याने त्यांना जमीन वापर मूल्यातून घसघशीत आर्थिक लाभ होईल.
हरित ऊर्जा निर्मिती क्षेत्रातील तज्ञांच्या मते या ऊर्जा निर्मितीमुळे सर्वसामान्य भारतीयाला अर्थार्जन करण्याची संधी प्राप्त होते. पारंपारिक विद्युत ऊर्जेच्या तुलनेत ही ऊर्जा स्वस्त असल्याने उपभोक्त्यांच्या खिशावरील भार काही प्रमाणात हलका होईल. सर्वतोपरी देशातील सर्व घटकांकरता फायदेशीर असणारी हरित ऊर्जा ही प्रत्येक निकषाद्वारे राष्ट्र उद्धारक आहे.
महाराष्ट्रातील ऊर्जा क्षेत्राला चालना देणाऱ्या महत्त्वाच्या पावलांपैकी एक म्हणजे २३ जून २०२५ रोजी झालेला SECI (Solar Energy Corporation of India) आणि MAHAPREIT (Mahatma Phule Renewable Energy and Infrastructure Technology Ltd.) यांचा सामंजस्य करार (MoU). या करारानुसार राज्यात विविध हरित ऊर्जा प्रकल्प उभारले जाणार असून सौर ऊर्जा, बायोमास, वाऱ्यावर आधारित आणि हायब्रिड तंत्रज्ञानाचा उपयोग करून स्वच्छ ऊर्जा निर्मितीला गती दिली जाणार आहे.
या भागीदारीचा उद्देश फक्त स्वच्छ ऊर्जा उत्पादनात वाढ करणे एवढाच नसून, ग्रामीण भागातील आर्थिक संधी वाढवणे, रोजगार निर्मिती करणे आणि जागतिक हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक उपाययोजना राबवणे हा देखील आहे. या कराराच्या माध्यमातून महाराष्ट्रात सौर फीडर, सोलर पंप, बॅटरी स्टोरेज सिस्टिम, स्मार्ट ग्रिड अशा अत्याधुनिक यंत्रणा उभारल्या जातील.
या प्रकल्पामुळे महाराष्ट्र हरित ऊर्जा उत्पादनात देशात आघाडीवर येण्याची शक्यता आहे. तसेच, राज्याच्या ऊर्जानिर्मितीत स्वावलंबन वाढणार असून कोळसा व अन्य प्रदूषक इंधनांवरील अवलंबित्व कमी होईल. पुढील सहा महिन्यांत या कराराची अंमलबजावणी कशी होते, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले आहे. त्याकरिता जमीन उपलब्धता व सामाजिक परवानगी प्रक्रियेचे सुलभीकरण अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.
पवन ऊर्जा निर्मितीमध्ये भारत हा जगातला चौथ्या क्रमांकाचा देश बनला आहे. पवन ऊर्जा निर्मितीसाठी भारतातील निवडक ३३९ सुयोग्य ठिकाणांपैकी ४० ठिकाणे ही महाराष्ट्रात आढळतात.राज्यात सध्या धुळे,बीड,धाराशिव, सांगली आणि सातारा या पवन ऊर्जेसाठी आकांक्षित जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पवन ऊर्जा निर्मिती केली जात आहे. आगामी काळातील हरित ऊर्जेची निकड पाहता उपरोक्त जिल्ह्यांमध्ये विकास वाढीचा दर तेजाने वधारणार आहे.
शेषराव मोरे,ऊर्जा पारेषण तज्ञ.
(निवृत्त विद्युत ऊर्जा पारेषण अधिकारी)