सिंदफळ शिवारात शेतकऱ्याचा स्टीलच्या रॉडने केला खुन
शेतीच्यावाद ठरला कर्दनकाळ; शेतकऱ्याचा निर्घृण खून !
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर तालुक्यातील सिंदफळ शिवारात एका ५७ वर्षीय मुसलीम शेतकऱ्याचा अज्ञात कारणावरून निर्घृण खून करण्यात आला आहे. मोटरसायकलच्या स्टीलच्या रॉडने मारहाण करत हा खून दि.५ मार्च रोजी सायंकाळी सातच्या सुमारास घटना समोर आली आहे. या प्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनास्थळी रक्ताच्या थारोळ्यात शेतकरी
मयत सत्तार यासीम इनामदार (वय ५७) हे सायंकाळी आपल्या शेतातील विहिरीतील मोटर सुरू करण्यासाठी गेले होते. मात्र बराच वेळ होऊनही ते परत न आल्याने त्यांचा मुलगा सोहेल शेतात गेला असता, त्यांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेले पाहून हादरला. त्यांच्या डोक्यात स्टीलच्या रॉडने जबर मारहाण झाल्याचे दिसून आले. तातडीने ही माहिती कुटुंबीयांना कळवण्यात आली आणि गंभीर अवस्थेत त्यांना उपजिल्हा रुग्णालय, तुळजापूर येथे दाखल करण्यात आले. मात्र, अधिक रक्तस्त्राव झाल्याने पुढील उपचारासाठी सोलापूर येथे पाठवण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
घटना स्थळी दारूच्या बाटल्या, सिगारेट व बिअरच्या बाटल्या
घटनास्थळी पोलिसांना दारूच्या बाटल्या, सिगारेटचे पाकिटे, कुरकुरेचे पॉकेट आणि आंब्याच्या झाडाखाली पडलेल्या कैऱ्या आढळून आल्या. त्यामुळे या हत्येच्या मागे नेमके कोणते कारण आहे, घात की अपघात याचा तपास सुरू आहे.
गावात दहशतीचे वातावरण – आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार
या घटनेची माहिती मिळताच तुळजापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ निलेश देशमुख, पोलीस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. वसीम गफुर इनामदार (वय ३५, रा. सिंदफळ) यांच्या फिर्यादीवरून गणेश घाटशिळे आणि त्याच्या दोन साथीदारांविरुद्ध कलम 103(1), 3(5) भारतीय न्यायसंहिता 2023 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, मुख्य आरोपी गणेश घाटशिळे हा यापूर्वीही अनेक गुन्ह्यांमध्ये अडकलेला असून, काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी त्याच्याकडून गांजा जप्त केला होता. तो सध्या जामिनावर बाहेर होता. आता त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक आण्णासोब मांजरे करत असून, खुनाचे नेमके कारण काय, हे तपासाअंती स्पष्ट होईल.