तामलवाडीतील शेतकरी हवालदिल! बँक ऑफ महाराष्ट्रची सक्तीची वसुली, सर्जेराव गायकवाड यांचा मुख्यमंत्रीांना मेल !
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
पावसाने हाहाकार माजला आहे शेतकरी राजावर आता बँकांच्या नोटिसांचा पाऊस… तामलवाडी शाखा (बँक ऑफ महाराष्ट्र) कडून शेतकऱ्यांच्या पिक कर्जाची सक्तीची वसुली सुरू असून, वकीलमार्फत नोटिसा, लोकअदालतीच्या हजेरीचे आदेश काढून शेतकरी भयभीत होत आहेत. यामुळे सामाजिक कार्यकर्ते सर्जेराव गायकवाड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि जिल्हाधिकारी यांना ई-मेल पाठवून या वसुलीला लगाम घालावा, अशी मागणी केली आहे.
शेतकऱ्यांचा आक्रोश – कर्जाचे ओझे, पिकांचे नुकसान!
कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टी, तर कधी बाजारात भाव न मिळाल्याने शेतकरी कर्जाच्या विळख्यात सापडला आहे. उसणवारी, सावकारी आणि बँकांचे हप्ते भरताना शेतकऱ्यांची दमछाक होत आहे. पोटाची खळगी, मुलांच्या शिक्षणाचा खर्च आणि दवाखान्याचे बिल सांभाळताना शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर पोचत आहेत. त्यातच आता बँकेची दरवाज्यावर टकटक, वकिलांची नोटीस आणि लोकअदालतीचे आदेश… शेतकऱ्यांचा मानसिक छळ वाढवणारे ठरत आहेत.
आमदार–खासदारांकडे अपेक्षा
शेतकऱ्यांचे कैवारी म्हणवणारे आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांनी याकडे तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे. “पिक कर्जाची सक्तीची वसुली थांबवा, शेतकऱ्यांना दिलासा द्या!” – अशी जनतेची एकमुखी हाक आहे.
बँक शाखा – व्यवस्थापकांचा शोधमोहीम!
यात आणखी गंमत म्हणजे, सक्तीच्या वसुलीच्या नावाखाली बँक व्यवस्थापक आठवड्याचे आठवडे बँकेतून गायब! सकाळी बँक उघडतात आणि लगेचच बाहेर पडतात. परत येतात ते थेट संध्याकाळी सहाला. दिवसभर कामासाठी आलेले नागरिक ताटकळत बसतात, रिकाम्या हाताने घरी परत जातात. बँक व्यवस्थापक गायब असल्याने नागरिकांना नाहक भटकंती व त्रास सहन करावा लागत आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी जनतेची मागणी जोर धरू लागली आहे.
थोडक्यात :
शेतकरी एका बाजूला निसर्गाच्या लहरींनी हैराण तर दुसऱ्या बाजूला बँकेच्या सक्तीच्या वसुलीने त्रस्त. आता याला कुणी अटकाव करणार का? मुख्यमंत्री आणि लोकप्रतिनिधींच्या निर्णयाकडे शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत.