तुळजापूरात आरक्षणाच्या विवंचनेत इसमाची आत्महत्या “आरक्षण नाही टिकले तर लेकरांचे शिक्षण कसे होणार?” – आत्महत्याग्रस्ताची चिठ्ठी

तुळजापूरात आरक्षणाच्या विवंचनेत इसमाची आत्महत्या

“आरक्षण नाही टिकले तर लेकरांचे शिक्षण कसे होणार?” – आत्महत्याग्रस्ताची चिठ्ठी

तुळजापूर  : ज्ञानेश्वर गवळी

मराठा समाजाचे आरक्षण टिकेल की नाही या अस्वस्थतेतून तुळजापूर शहरातील जिजामातानगर येथील दिगंबर वसंत काचोळे वय ५५ या इसमाने आत्महत्या केली. त्यांच्या खिशातून सापडलेल्या चिठ्ठीत “माझ्या कुटुंबाचे पालकत्व मनोज दादा जरांगे पाटलांनी घ्यावे” असे स्पष्टपणे लिहिलेले आढळले आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

गणेशोत्सवात आनंद, पण दोन दिवसांपासून चिंतेत

काचोळे कुटुंबाला नुकत्याच जाहीर झालेल्या मराठा आरक्षणामुळे आनंद झाला होता. त्यांच्या घराजवळील राजे संभाजी गणेश मंडळाने देखील यंदा गणेशोत्सवात आरक्षणाच्या निमित्ताने विशेष देखावा उभारला होता. दिगंबर काचोळे यांनीही समाजबांधवांसमवेत उत्सव साजरा केला. पण मागील दोन दिवसांपासून आरक्षणाविरोधातील बातम्या टीव्हीवर सतत दिसू लागल्याने ते अस्वस्थ झाले होते. “आरक्षण नाही टिकले तर माझ्या लेकरांचे शिक्षण कसे पूर्ण करणार?” अशी खंत ते व्यक्त करत होते.

खोलीत गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली

दि. ८ सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास कुटुंबीयांसोबत संवाद साधल्यानंतर दिगंबर काचोळे आपल्या खोलीत गेले. मुलांच्या डोक्यावरून हात फिरवून त्यांनी दरवाजा बंद केला आणि गळ्यातील भगव्या पंच्याच्या साहाय्याने पत्र्याखालील लोखंडी आडूस गळफास घेतला. काही वेळाने मुलांनी दरवाजा ठोठावूनही प्रतिसाद न मिळाल्याने चुलत्याने दरवाजा तोडला असता ते मृतावस्थेत आढळले. पोलिसांना खबर दिल्यानंतर मृतदेह तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला.

या प्रकरणी मयताचे भाऊ विश्वंभर वसंत काचोळे यांच्या फिर्यादीवरून तुळजापूर पोलिस  ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस श्रीनिवास आरवाड हे करत आहेत.

या घटनेमुळे तुळजापूर तालुक्यासह संपूर्ण मराठा समाजामध्ये हळहळ व्यक्त केली जात असून, आरक्षण टिकविण्यासंदर्भात शासनाने तातडीने ठोस भूमिका मांडावी, अशी मागणी होत आहे.

चिठ्ठीतून व्यक्त झाली समाजातील असुरक्षितता

काचोळे यांच्या खिशातून सापडलेल्या चिठ्ठीत त्यांनी आपल्या कुटुंबाचे पालकत्व मनोज दादा जरांगे पाटलांनी घ्यावे अशी विनंती केली आहे. या चिठ्ठीमुळे मराठा आरक्षण प्रश्नाने सर्वसामान्य समाजबांधवांच्या मनात किती खोलवर अस्वस्थता निर्माण केली आहे हे स्पष्ट झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!