उबाठा गटाचे आंतरराष्ट्रीय प्रवक्ते संजय राऊत यांचे संघाच्या बाबतीत तसेच संघाच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दलच्या श्रद्धेबद्दलचे त्यांचे ज्ञान अगदीच कच्चे आहे – मंत्री चंद्रकांत पाटील यांचे टीकास्त्र
मुंबई : खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सध्या सुरु असलेल्या जाहिरातींवरून भाजपवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी नागपूरच्या संघ मुख्यालयामध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आणि त्या परिसरामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा लावणं गरजेच आहे, अशी टीका केली. यावरून भाजप नेत्यांनी संजय राऊत यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला.
चंद्रकांत पाटील यांनी म्हटले कि, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही राष्ट्रवादी विचारांची संघटना आहे. देश आणि हिंदुत्व यांच्या प्रत्येक प्रतिकाबद्दल संघाला आणि संघाच्या प्रत्येक स्वयंसेवकाला नितांत आदर आणि अपार श्रद्धा आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे संघासाठी दैवत आहेत. म्हणूनच संघाच्या प्रत्येक कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा असतेच. शिवाय संघाच्या प्रत्येक उत्सवात दोन सरसंघचालकांच्या म्हणजेच आद्य सरसंघचालक परमपूज्य डॉ. हेडगेवार जी आणि परमपूज्य गोळवलकर गुरुजी यांच्या प्रतिमेच्या मधोमध शिवरायांची प्रतिमा ठेऊन तिचे पूजन केले जाते. गेली १०० वर्षे ही परंपरा अखंडपणे सुरु आहे, आणि अनंतापर्यंत सुरु राहील याची प्रत्येक स्वयंसेवकाला खात्री आहे. उबाठा गटाचे आंतरराष्ट्रीय प्रवक्ते संजयजी राऊत यांना सर्व विषयांचे सर्वाधिक आणि सर्वोत्तम ज्ञान असते, त्याबद्दल आमच्या मनात तिळमात्र शंका नाही. पण संघाच्या बाबतीत तसेच संघाच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दलच्या श्रद्धेबद्दलचे त्यांचे ज्ञान अगदीच कच्चे आहे. त्यांनी भारतातील संघाच्या कोणत्याही कार्यालयाला कधीही भेट द्यावी, त्यांचे संघ विषयक अज्ञान नक्की दूर होईल, अशी मिश्किल टिपणी चंद्रकांत पाटील यांनी केली.
संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
छत्रपती शिवाजी महाराजांना प्रणाम करणं हे प्रत्येक मराठी माणसाचे कर्तव्य आहे. पण अजूनही भारतीय जनता पक्षाचे लोक छत्रपती शिवाजी महाराजांसमोर त्यांना फुलं वाहतायत त्यांना अभिवादन करतायत अशी जाहिरात बाजी काल केली. जाहिरात कोणी दिली? त्या संस्थेच त्या व्यक्तीचं नाव नाही. पण साधारण आम्ही काल या जाहिरातींचा महाराष्ट्र आणि देशभरातला अंदाज घेतला. वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर जाहिरात, टीव्ही वाहिन्यांवर जाहिरात, राज्यभरामध्ये होर्डिंगच्या माध्यमातून जाहिरात. हा सगळा खर्च साधारण 40 ते 50 कोटी रुपये आहे. आम्ही काल साधारण अंदाज काढला त्याचा 40 ते 50 कोटी रुपये एका दिवसात जाहिरातीसाठी खर्च झाले. देवाभाऊ म्हणजे राज्याचे मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेवर फुलं उधळण्यासाठी, प्रतिमा सुधारण्यासाठी हे पैसे खर्च केले. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं, देशाचं दैवतच. भारतीय जनता पक्षाच्या ओरिजनल नव्हे तर डुप्लिकेट तर बाटग्यांनी ही जाहिरात दिलेली आहे. त्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयातसुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावावा. नागपूरच्या संघ मुख्यालयामध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आणि त्या परिसरामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा लावणं गरजेच आहे. त्यावरून संघांच महाराजांवरचं प्रेम खरं आहे ते कळेल. त्या जाहिरातीतून काय सूचित करायच आहे? याचे वेगळेवेगळे अर्थ काढले जात आहेत.